भाषणे, प्रस्तावनांची जागतिक नोंद झाल्याबद्दल गौरव
मनोहर कोलते मैत्र संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
Team MyPuneCity – उत्तम लेखणी आणि वाणी हे डॉ. श्रीपाल सबनीस यांचे वैशिष्ट्य असून ते जनसामन्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. आतापर्यंत झालेल्या संमेलनाध्यक्षांकडून (Pune) साहित्य क्षेत्रात जे कार्य झाले नाही ते कार्य गेल्या आठ वर्षांत डॉ. सबनीस यांच्याकडून झाले आहे. यामुळेच ते जनसामान्यांसह असामान्य व्यक्तीमत्त्वांचेही आवडते लेखक व वक्ते आहेत, असे गौरवोद्गार सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी काढले.
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या संमेलनाध्यक्ष पदावरील विविधांगी कर्तृत्वाची नोंद जागतिक पातळीवर ‘हाय रेंज वर्ल्ड रेकॉडॅस्’ या संस्थेने घेतली आहे. डॉ. सबनीस यांनी संमेलनाध्यक्ष हे पद भूषविल्यानंतर गेल्या 8 वर्षांतील 1648 भाषणांची व 507 प्रस्तावनांची नोंद घेऊन ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून मान्यता दिली आहे. या विश्वविक्रमाबद्दल मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे संस्थेतर्फे त्यांचा सत्कार आज (दि. 24) डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी डॉ. मुजुमदार बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डॉ. माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हैद्राबाद येथील हाय रेंज वर्ल्ड रेकॉर्डस् या संस्थेतर्फे मिळालेले मानपत्र, मानचिन्ह, पदक मान्यवरांच्या हस्ते डॉ. सबनीस यांना प्रदान करण्यात आले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार दीपक पायगुडे, समीक्षक डॉ. केशव देशमुख, मनोहर कोलते (Pune) उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार पुढे म्हणाले, केवळ आठ वर्षांत मोठ्या संख्येने दिलेली भाषणे आणि विविध जाती-धर्माच्या लेखकांच्या पुस्तकांसाठी प्रस्तावना लिहिणे हे सोपे कार्य नाही. प्रस्तावना लिहिताना पुस्तकाचे सखोल वाचन, लेखकाची मानसिकता ओळखणे, त्याला काय सांगायचे आहे हे समजून घेणे आवश्यक असते. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेल्या प्रस्तावना इतक्या उत्तम असतात की, मूळ पुस्तक वाचण्याची आवश्यकताही भासू नये. त्यांच्या या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली याचा मनस्वी आनंद आहे.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, डॉ. सबनीस हे हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व असून साहित्य क्षेत्रातील त्यांचा व्यासंग सखोल आहे. वैचारिक व्यासपीठ उभे करणाऱ्या साहित्यिक प्रस्तावना त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिल्या आहेत. उत्तम लेखक व वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ध्येयाने प्रेरित होऊन नवलेखकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य डॉ. सबनीस करत आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी प्रास्ताविकात मनोहर कोलते यांनी माहिती विशद केली. गिर्यारोहक स्मिता घुगे यांच्या सहकार्यामुळे विक्रमाची नोंद करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सबनीस हे साहित्य क्षेत्रातील महान कर्मयोगी, निष्ठावान, अभ्यासू व्यक्तीमत्त्व असल्याचे गौरवोद्गार दीपक पायगुडे यांनी काढले. डॉ. केशव देशमुख यांनी डॉ. सबनीस यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. ह. भ. प. विजय बोथरे-पाटील यांनी मनोगत व्यक्त (Pune) केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान थिटे यांनी केले तर आभार शैलेद्र भालेराव यांनी मानले.