Team My Pune City – दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या(Pune ) रात्री पुणे शहरात फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागण्याच्या तब्बल 42 घटना घडल्या असून, ही सर्व घटनांची नोंद पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात सायंकाळी 5 वाजेपासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनांमुळे शहरातील अग्निशमन दलाची दिवसभर चांगलीच धावपळ झाली.
प्रमुख घटनांचा आढावा:
संध्याकाळी ५ नंतरच पहिली आग हडपसरच्या गल्ली क्रमांक १५ येथे मोकळ्या जागेत लागली आणि त्यानंतर फक्त काही मिनिटांतच शहरभर आग लागण्याच्या घटनांची मालिका सुरू झाली.
संध्याकाळी ७ वाजेपासून ते ९ वाजेपर्यंत सर्वाधिक घटना घडल्या, विशेषतः वारजे, नऱ्हे, काळेपडळ, कसबा पेठ, विमाननगर, आणि मांजरी खुर्द परिसरात गच्च्या, गॅलऱ्या व मोकळ्या मैदानांमध्ये लागलेल्या आगींच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
Nakul Bhoir Murder : घरगुती कलहातून सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीने केला खून
Kothrud Crime News : कोथरूडमध्ये घरफोडी; आठ लाख दहा हजारांचा ऐवज चोरीला
त्यानंतर रात्रीच्या सुमारास बाणेर, विश्रांतवाडी, धानोरी, येरवडा, सिंहगड रोड, बिबवेवाडी आणि औंध परिसरात घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये आणि गोडाऊनमध्ये आग लागल्याचे प्रकार नोंदवले गेले.
विशेषतः सदाशिव पेठ, बिबवेवाडी, आणि दांडेकर पूल चौक येथे लागलेल्या आगींमध्ये इमारतींच्या पार्किंग भागात वाहनं जळाल्याची नोंद आहे. नाना पेठ भाजी मंडई येथे तर एका इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागली.
पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या सर्व केंद्रांमधून — मध्यवर्ती, हडपसर, वारजे, कोथरूड, नवले, येरवडा, बाणेर, धानोरी, गंगाधाम, औंध, सिंहगड, जनता, कसबा, पाषाण इत्यादी ठिकाणांहून अग्निशमन वाहनं घटनास्थळी पाठविण्यात आली. अनेक घटनांमध्ये एकापेक्षा अधिक केंद्रांची वाहनं ‘परस्पर मदतीने’ तैनात करण्यात आली.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक आगी फटाके उडवताना निघालेल्या ठिणग्यांमुळे गच्च्यांवरील वस्तूंना, गवताला, झाडांना, किंवा कचऱ्याला लागल्या.
सुदैवाने जीवितहानी टळली
अग्निशमन नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले की, कोठेही जखमी किंवा मृत्यूची नोंद नाही. वेळेवर मिळालेल्या तक्रारींमुळे आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठे अपघात टळले. मात्र, काही ठिकाणी घरांतील वस्तू, इलेक्ट्रिक उपकरणे आणि दुचाकी जळून खाक झाली आहेत.
अग्निशमन दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, फटाके उडवताना सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच गच्च्यांवर व मोकळ्या जागी ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत. आग लागल्यास त्वरित 101 किंवा नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.


















