गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित मुक्तसंगीत चर्चासत्र
Team MyPuneCity –भरतनाट्यम् ही मंदिरात ईश्वरासमोर सादर होणारी कला असून तो ईश्वराप्रती पोहोचण्याचा मार्ग आहे. ज्या प्रमाणे योगसूत्रात अष्टांग योग आहेत त्याप्रमाणे नृत्ययोगातही अनेक हस्तमुद्रा व वर्ण यांच्याद्वारे योगसूत्राची मांडणी केलेली दिसते. अष्टांग योगात यम, नियम, आसन अशा क्रमाने समाधीपर्यंत पोहोचता येते. त्याचप्रमाणे भरतनाट्यम् नृत्याद्वारे पुष्पांजली, अलारिपु या क्रमाने पुढे जात तिल्लानातून सच्चितानंदाचा आविष्कार प्रकट होतो. त्यामुळेच योग ही एकांतसाधना असेल तर नृत्य हा लोकांतात केलेला योग आहे, असे विचार सुप्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांनी व्यक्त केले.
गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुक्तसंगीत चर्चासत्रात दुसऱ्या दिवशी (दि. 13) नृत्यगुरू स्वाती दैठणकर यांचे ‘नृत्ययोग.. अद्वैताचा प्रवास’ या विषयावर शिष्यांसह स-प्रत्याक्षिक व्याख्यान झाले. त्या वेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधला. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांची विशेष उपस्थिती होती. गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख पंडित अतुलकुमार उपाध्ये, गानवर्धनच्या कोषाध्यक्ष सविता हर्षे मंचावर होते. नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांच्यासह त्यांच्या शिष्या राजलक्ष्मी बागडे, शलाका माडगे, मैथिली साने, श्रीया जोशी यांचा कार्यक्रमात सहभाग होता.
Mahesh Landge:हिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक
योग ही वैयक्तिक साधना आहे, परंतु नृत्ययोगातून उर्जेचे वहन होऊन नृत्य नर्तकालाच नव्हे तर दर्शकांनाही समाधीची अनुभूती मिळू शकते. आध्यात्मानुसार राजयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग असतील तर आत्मा, परमात्मा आणि गुरूंचे प्रतिक दर्शविणारा नृत्ययोग आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. एवढे सामर्थ्य नृत्यकलेत आहे, असे स्वाती दैठणकर म्हणाल्या. कला ही आयुष्यापेक्षा मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. योग आणि नृत्याची तत्त्वे दर्शविणाऱ्या नटराजाचे वर्णन करणारी ‘सांब सदाशिव’ ही रचना नृत्यातून सादर करण्यात आली. कर्ण आणि भरतनाट्यम् तसेच कर्ण आणि योग यातील साधर्म्य सांगणाऱ्या रचनाही प्रात्यक्षिकांसह सादर करण्यात आल्या. पंचमहाभूते, द्वैत-अद्वैताचा प्रवास दर्शवत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी’ अशा विविध ओव्यांवरही नृत्यविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ‘असतो मा सद्गमय’ या रचनेतून साकारण्यात आली.
कथक नृत्यांगना डॉ. आसावरी रहाळकर आणि भरतनाट्यम् नृत्यांगना रमा कुकनूर यांचा विशेष गौरव स्वाती दैठणकर, डॉ. किशोर सरपोतदार यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. किशोर सरपोतदार म्हणाले, मुक्त संगीत चर्चासत्राच्या माध्यमातून आजचे कलाकार पुढील पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे. कलाकार आणि रसिकांमधील नाते दृढ होण्यासाठी गानवर्धन, स्वरझंकार सारख्या संस्था कार्यरत आहेत. नामवंत, गुणी कलाकार शोधून त्यांचे कार्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे रत्नपारख्याचे काम या संस्था करीत आहेत.
प्रास्ताविक दयानंद घोटकर यांनी तर डॉ. नीलिमा राडकर यांनी सूत्रसंचालन केले. कलाकारांचा सत्कार पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला. कुमुद धर्माधिकारी, प्रसिद्ध संतुरवादक डॉ. धनंजय दैठणकर, डॉ. राजश्री महाजनी, डॉ. विद्या गोखले, मुकुंद जोशी, वासंती ब्रह्मे, अजित कुमठेकर यांची उपस्थिती होती.