Team MyPuneCity -हडपसर व लोणीकाळभोर भागात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत वाहन चोराला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन होंडा शाईन मोटारसायकल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांची एकूण किंमत अंदाजे ४० हजार रुपये असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये या वाहनांच्या चोरीची नोंद आहे.
दि. २० मे २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे व चेतन शिरोळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मांजरी येथील सुर्यमुखी गणेश मंदिराजवळ, पुनावाला चौक, हडपसर रोड परिसरात एक तरुण विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या थांबलेला असल्याचे आढळून आले. तातडीने कारवाई करत पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले.
त्याचे नाव आकाश सुरेश वाघरी (वय २३, सध्या रा. प्लॉट नं. ११, तायम्मा मंदिराजवळ, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे) असे असून, त्याच्याकडील गाडीची चौकशी केली असता सदर होंडा शाईन मोटारसायकल ही हडपसरमधील मगरपट्टा परिसरातून १५ ते २० दिवसांपूर्वी चोरी केल्याचे त्याने कबूल केले. गाडीची चेसिस व इंजिन नंबर तपासणी केली असता तिचा नोंदणीकृत क्रमांक एम.एच.१२ पी.एफ.६३८७ असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत २७ एप्रिल रोजी टेस्टी पंजाब हॉटेल, हडपसर येथून गाडी चोरीला गेल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल होती.
Pune: प्रदूषण न रोखल्यास मानवी अस्तित्वालाच धोका – रमेश खरमाळे
याचप्रमाणे, आकाश याच्याकडे पुढील चौकशी केली असता, त्याने आणि त्याच्या एका मित्राने लोणीकाळभोर टोलनाक्याजवळून आणखी एक होंडा शाईन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदर गाडीची तपासणी करताच ती एम.एच.१२ एन.आर.०९९४ क्रमांकाची असल्याचे निष्पन्न झाले. ही मोटारसायकल कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर येथून २७ एप्रिल रोजी चोरीला गेल्याची तक्रार लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार अमित बोडरे, विशाल मिलारे, किशोर दुशिंग, महेंद्र तुपसौदर, चेतन शिरोळकर, मंगेश गुंड, गणेश माने, अक्षय गायकवाड, उमेश मठपती, भाग्यश्री वाघमारे यांचा समावेश होता.
आरोपी सध्या हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून, त्याच्याविरोधात पुढील तपास सुरू आहे.