Team My Pune City – पर्वती दर्शन कॉलनी (स्वारगेट) येथील (Pune Crime News) राहत्या घरात सोमवारी (दि . 22 जुलै) सकाळी एका 25 वर्षीय तरुणाची चाकूने गळ्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पार्वती पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव दानिश सिद्दिकी (वय 25) असे असून तो पर्वती दर्शन येथे आपल्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता. तो दाबेलीची हातगाडी चालवून उदरनिर्वाह करीत होता. हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव दिनेश प्रभाकर क्षीरसागर (वय 35, रा. यवतमाळ जिल्हा) असे आहे.
PMPML : पुणेकरांसाठी पीएमपीएमएलकडून तीन नवीन बसमार्गांची सुरूवात
Ajit Pawar : अजितदादांचं नेतृत्व म्हणजे दिशा, ध्यास आणि दृढनिश्चय – प्रशांत भागवत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी दानिशच्या घराचे दार उघडे होते. त्याच दरम्यान क्षीरसागर हा घरात बिनधास्त शिरला. अनोळखी व्यक्तीला घरात पाहून दानिशने त्याला रोखले. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट झाली. झटापटीदरम्यान क्षीरसागरने चाकू काढून दानिशच्या गळ्यावर गंभीर वार केला.
गंभीर जखमी दानिशला तातडीने सारस बाग जवळील हरजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर आरोपी पळून गेला. परंतु पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक यांनी तत्काळ तपास सुरू केला. सायंकाळच्या सुमारास सातारा रोड परिसरात आरोपीला अटक करण्यात आली. “त्याच्या अंगावर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसत होते,” अशी माहिती तपासातील अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षीरसागर चौकशीत सतत गोंधळलेली व विस्कळीत माहिती देत आहे. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपी आणि मृत दानिश यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क अथवा ओळख नव्हती, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.