Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला असून, तिच्या लग्नावेळी दिलेलं ५१ तोळे सोनं तिच्या सासऱ्यांनी फेडरल बँकेत गहाण ठेवल्याचं उघड झालं आहे. हे सोनं गहाण ठेवण्यासाठी वैष्णवीची परवानगी घेण्यात आली होती का, की तिला छळ करून ते जबरदस्तीने घेतलं गेलं? याचा तपास सध्या पुणे पोलिस करत आहेत.
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह २०२३ मध्ये झाला होता. लग्नावेळी वैष्णवीच्या वडिलांनी – आनंद कस्पटे – यांनी हगवणे कुटुंबाला ५१ तोळे सोने, ७ किलो चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी, अॅक्टिवा स्कूटर आणि अन्य कीमती वस्तू दिल्या होत्या. एवढं देऊनही हगवणे कुटुंबाच्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न मिळाल्याने वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला, असा आरोप तिच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे.
पोलिस तपासात समोर आले की, लग्नात दिलेलं सोनं सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी फेडरल बँकेत गहाण ठेवले होते. त्यामागचा उद्देश काय होता? आणि वैष्णवीच्या संमतीशिवाय हे कृत्य करण्यात आलं का? याचा तपास सुरू आहे. वैष्णवीचा मानसिक छळ याच कारणांमुळे वाढला का? यावरही आता अधिक चौकशी सुरू आहे. पोलिसांनी फॉर्च्युनर गाडी आणि अॅक्टिवा स्कूटर जप्त केली आहे.
या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे सुरुवातीला फरार होते. त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना यापूर्वीच अटक झाली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राज्य कार्यकारिणी सदस्य असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
१६ मे रोजी वैष्णवी हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोस्टमार्टममध्ये तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण सापडले होते. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी वैष्णवीवर संशय घेऊन, तिला शिव्याशाप देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालणे, चांदीची भांडी परत मागणे आणि हुंड्याच्या नावाखाली पैशांची मागणी करत छळ सुरू होता.
या प्रकरणात आणखी काही धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांचा तपास सुरू असून, बँकेत गहाण ठेवलेलं सोनं, त्याची प्रक्रिया, तसेच यात गुन्हेगारी हेतू होता का, याचा बारकाईने तपास सुरू आहे.