Team MyPuneCity – खराडी रोड परिसरात साई कृष्णा हॉटेलजवळ ( Pune Crime News 26 May 2025 ) एका महिलेवर दुचाकीस्वारांनी हल्ला करून तिच्या गळ्यातील २ लाख ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ५६ वर्षीय महिला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी रोडवरील साई कृष्णा हॉटेलजवळून पायी जात होत्या. त्याच वेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. त्यांनी क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि दुचाकीवरून वेगाने पळ काढला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले करत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने खडकीत ११.७९ लाखांची फसवणूक ( Pune Crime News 26 May 2025 )
पुणे – शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ११ लाख ७९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ नोव्हेंबर २०२४ ते ९ डिसेंबर २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे ४३ वर्षीय खासगी कंपनीत नोकरी करणारे असून त्यांना सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंग संबंधित एक लिंक मिळाली. त्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधल्यावर, आरोपींनी त्यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे टाकायला लावले. एकूण ११.७९ लाख रुपये दिल्यानंतर आरोपी गायब झाले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बागवे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
हडपसरमध्ये वृद्धाच्या डोळ्यात मिरची टाकून चेन हिसकावली ( Pune Crime News 26 May 2025 )
पुणे – हडपसरमधील लोकसेवा हनुमान मंदिराजवळ एका वृद्धाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडून ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन लुटण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून हडपसर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
फिर्यादी हे ६५ वर्षीय नागरिक असून ते रस्त्यावरून पायी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यामुळे ते गोंधळून गेले आणि याच वेळी दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून तेथून पलायन केले. या प्रकारामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pune : ग्रामविकासाचा ‘दळवी पॅटर्न’ अभ्यासक्रमाचा भाग व्हावा – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर
पीएमपीएमएल बसमधून प्रवाशाच्या सॅकमधील ४.४५ लाखांचे दागिने चोरीला ( Pune Crime News 26 May 2025 )
पुणे – सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशाच्या सॅकमधून ४ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी पुणे स्टेशन ते गणेशखिंड मार्गावरील बस प्रवासादरम्यान घडली.
फिर्यादी प्रवासी हे पीएमपीएमएल बसने प्रवास करत होते. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या सॅकमधून दागिने असलेली बॅग चोरून नेली. या चोरीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.
विमाननगरमध्ये महिलेला लुटले; दुचाकीस्वारांकडून २.४५ लाखांचे मंगळसूत्र चोरी ( Pune Crime News 26 May 2025 )
पुणे – विमाननगरमधील लुंकड क्लासिक सोसायटीजवळ एका महिलेला दुचाकीस्वारांनी लुटले. ही घटना २५ मे रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले.
फिर्यादी ५२ वर्षीय महिला रिक्षा थांब्यावर उभी असताना, दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
वडगाव बुद्रुकमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण जखमी, वाहनांची तोडफोड ( Pune Crime News 26 May 2025 )
पुणे – सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुकमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. आरोपींनी परिसरातील चारचाकी व दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली. ही घटना रविवारी रात्री ९:४५ वाजता घडली.
फिर्यादी २७ वर्षीय तरुणावर आरोपींनी अचानक लोखंडी हत्याराने हल्ला चढवला. त्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील चारचाकी व दुचाकी गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय अधिक तपास करत आहेत.