Team MyPuneCity – भरधाव व बेफिकीर ट्रॅकरच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी बायपास चौक परिसरात घडली. या प्रकरणी (Pune Crime News 24 May 2025)विमानतळ पोलीस ठाण्यात ट्रॅकर चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज राठोड (वय २७, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. २२ मे २०२५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून खराडी बायपास चौकाजवळून जात होते. त्यावेळी एका ट्रॅकरने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत, भरधाव वेगात येत त्यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. या अपघातात सुरज राठोड यांच्या दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मित्र सिद्धार्थ हुल्लाजी धावटे (वय १९, रा. साडेसतरा नळी, हडपसर) गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अल्पवयीन ट्रॅकर चालकावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वेतन भोसले करत आहेत.
बुधवार पेठेत किरकोळ वादातून तिघांकडून मारहाण; एक अटकेत (Pune Crime News 24 May 2025)
पुणे – बुधवार पेठेतील क्रांती चौकात किरकोळ वादातून तिघांनी मिळून दोघांना लाकडी फळ्याने व कमरेच्या पट्ट्याने मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.
शहाने अली सय्यद नुरइराणी (वय २५, रा. म. गांधी वसाहत, शिवाजीनगर), दुर्योधन अर्जुन रॉय (वय २२, रा. बुधवार पेठ, ढमढेर बोळ) आणि अबुहुसेन शेख (वय १९, रा. बुधवार पेठ, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील अबुहुसेन शेख यास अटक करण्यात आली आहे.
११ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजता क्रांती चौक, बुधवार पेठ येथे ही घटना घडली. फिर्यादी यांच्या मित्राचा एका अनोळखी महिलेशी झालेल्या वादावरून, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत लाकडी फळ्याच्या तुकड्याने व पट्ट्याने मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहेत.
वडगावशेरीत घर साफ करण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबवला (Pune Crime News 24 May 2025)
पुणे – घरात पेस्ट कंट्रोल करण्याच्या बहाण्याने प्रवेश करून चार अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून सुमारे २.४७ लाखांचा ऐवज लांबवला. चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७९ वर्षीय नागरिक (रा. वडगावशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. १५ मे ते १९ मे २०२५ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या कालावधीत ही घटना घडली. चोरट्यांनी पेस्ट कंट्रोलसाठी आल्याचे भासवून फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर संधी साधून त्यांनी घरातून चांदीच्या सुमारे ८० हजार रुपयांच्या वस्तू व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण २,४७,१२० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक असवले करत आहेत.