Team MyPuneCity – वाघोली परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाची ऑनलाईन शेअर ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल २१ लाख २१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक (Pune Crime News 23 May 2025) करण्यात आली. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला एका अनोळखी मोबाईल धारकाने संपर्क करून शेअर ट्रेडिंग व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल असे सांगितले. सुरूवातीला थोडा परतावा देत त्याचा विश्वास संपादन केला. मात्र नंतर ऑनलाईन व्यवहाराद्वारे त्याच्याकडून एकूण २१ लाख २१ हजार ५१५ रुपये उकळले. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी अद्याप मोकाट आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत.
बनावट कॉल करून काळेपडळ येथील व्यक्तीची ३.२७ लाखांची फसवणूक (Pune Crime News 23 May 2025)
मोबाईल कॉलवरून बँक तपशील विचारून काळेपडळ हडपसरमधील ४४ वर्षीय व्यक्तीची तब्बल ३ लाख २७ हजार ४७७ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दि. २७ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादी यांना कॉल करून बँक खात्याची माहिती घेतली आणि त्यांच्या खात्यातून वरील रक्कम ट्रान्सफर करून घेतली. पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक व खातेदाराविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे करीत आहेत.
भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा (Pune Crime News 23 May 2025)
येरवडा येथील नगररोडवरील शास्त्रीनगर चौकात रस्ता ओलांडताना एका वृद्धाला भरधाव वाहनाची जोरात धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
मयताचे नाव अगोधी भिगाप्पा विरानाळे (वय ७२, रा. वडारवस्ती, येरवडा) असे आहे. दि. २० मे रोजी सकाळी ९ वाजता अपघात घडला. चौकशीनंतर येरवडा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील करत आहेत.
हडपसरमध्ये वृद्ध महिलेला भरधाव टेम्पोची धडक; मृत्यू (Pune Crime News 23 May 2025)
हडपसर येथील रविदर्शन चौकात एका ८२ वर्षीय वृद्ध महिलेला टेम्पोने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी होऊन मरण पावल्या. या अपघातात टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.
मृत महिला विमलाबाई मथुराप्रसाद अगरवाल असून, आरोपीचे नाव विनोद भगवान गायकवाड (वय ४५, रा. लोणीकाळभोर) असे आहे. तो टेम्पो भरधाव व अविचाराने चालवत होता. त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून सदर अपघात घडवला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार करीत आहेत.
कोंढव्यात घरफोडी; सोनं व रोख मिळून ३.१४ लाखांचा ऐवज लंपास (Pune Crime News 23 May 2025)
कोंढवा खुर्द परिसरातील आश्रफी मस्जिदजवळील एका बंद फ्लॅटचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ३.१४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.
फ्लॅटमधील लोखंडी कपाट उघडून चोरट्याने सेफ्टी लॉकरमधील रोख व दागिने चोरले. दि. २२ मे रोजी सकाळी १०:४५ ते दुपारी ३:३० या वेळेत ही घटना घडली. कोंढवा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव करत आहेत.
ससून रुग्णालयात दोन दिवसांच्या बालकाचा परित्याग; महिला फरार (Pune Crime News 23 May 2025)
ससून हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक २४ मध्ये एका महिलेनं आपल्या दोन दिवसांच्या मुलाचा परित्याग करून कोणालाही काही न सांगता रुग्णालयातून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना दि. १९ मार्च रोजी दुपारी २:३० ते ३:०० या वेळेत घडली. सदर महिला तिच्या नवजात मुलाची जबाबदारी असताना त्याचे पालनपोषण न करता त्याला रुग्णालयात सोडून निघून गेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करीत आहेत.