Team MyPuneCity –मंडपाचे काम सुरू असताना सुरक्षा साधनांची कोणतीही सोय न केल्याने एका मजुराचा काम करताना अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरोधात हलगर्जीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब छोटू कासदेकर (वय ४१, रा. कोरकुधाणा, ग्राम केरपानी, पोस्ट बोरगाव, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) हे पुण्यात शुभ गेट येथील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर मंडप उभारणीचे काम करत होते. हे काम २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सुरू होते. संबंधित ठेकेदाराने मंडप उभारणीसाठी मजुरांना कामाला लावले असताना त्यांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सुरक्षित जाळी यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने पुरविलेली नव्हती. तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली नव्हती.
सदर मजूर गुलाब कासदेकर मंडपाचे काम करत असताना तोल जाऊन उंचावरून खाली पडला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे यांनी फिर्याद दिली असून, ठेकेदाराविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी अद्याप अटकेत नाही.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे हे करत आहेत.
खेड शिवापूर टोल नाक्यावर तरुणाकडून वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की
खेड शिवापूर टोल नाका येथे एका वाहतूक पोलिसाला धक्का देत व अडथळा निर्माण करून शासकीय कामात अडथळा केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी प्रणव उमेश कदम (वय २३, रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) याने दि. १६ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक पोलिस कर्मचारी अरविंद ससाणे यांच्याशी वाद घालत त्यांना जबरदस्तीने धक्का दिला. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीस थांबवून विचारणा केली असता त्याने असहकार दाखवत पोलिसांना धक्का दिला. यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी खेड शिवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक अभिजीत भालेराव करीत आहेत.
वाहनातून ८० हजार रुपये किंमतीचे मादक द्रव्य हस्तगत
सिंहगड रस्त्यावर एका वाहनाची झडती घेतली असता पोलिसांनी ८० हजार रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स हस्तगत केले आहेत. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
आरोपी शरद गोविंद वाघमारे (वय ३०, रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. १७ मे रोजी रात्री ११.५० वाजता सिंहगड रोड येथील आनंदनगर येथे पोलिसांनी त्याच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता ८० हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले.
ही कारवाई सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन साळुंके व त्यांच्या पथकाने केली असून, आरोपीविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीररित्या गुटखा साठा करणाऱ्या दुकानदारावर कारवाई
उरळी देवाची परिसरातील एका किराणा दुकानात बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई करत दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सत्तार लियाकत इनामदार (वय ५०, रा. उरळी देवाची, हडपसर) याने आपल्या दुकानात विविध प्रकारचा तंबाखूजन्य व गुटखा साठवून ठेवला होता. पोलिसांनी १७ मे रोजी सकाळी छापा टाकून हा साठा हस्तगत केला.
ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपीविरोधात खाद्य सुरक्षा व प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकमधून ८ लाखांचे गुटख्याचे पाकिटे जप्त
बिबवेवाडी परिसरात एका ट्रकमधून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येणारा तब्बल ८ लाख ८२ हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सचिन अशोक सोनवणे (वय ३०, रा. पाटील वस्ती, न्हावरा, ता. शिरूर) व एक अज्ञात व्यक्ती यांनी एक ट्रक (क्र. एम. एच. १२ यू. डब्ल्यू. ५६७४) मध्ये गुटख्याचे मोठ्या प्रमाणात पाकिटे भरून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बिबवेवाडी येथे सापळा रचून कारवाई केली.
पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. ही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.