Team MyPuneCity – सोशल मीडियावर बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून एका व्यक्तीची तब्बल ₹१,३२,५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात ( Pune Crime News 13 June 2025) आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मार्केटयार्ड परिसरातील ४१ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
फसवणूक करणाऱ्या मोबाइलधारकाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून पैशांची मागणी करत फसवणूक केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण; विश्रांतवाडीत दोन जण अटकेत
किरकोळ वादातून तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील साईधाम सोसायटी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
फिर्यादी ४० वर्षीय व्यक्तीच्या सांगण्यानुसार, ११ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास परशुराम मानीके (२१), नागेश मानीके (१९) आणि त्यांच्या एका साथीदाराने मिळून शिवीगाळ करत मारहाण केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पद्मावतीत तिघांनी धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला ( Pune Crime News 13 June 2025)
पद्मावती परिसरातील तळजाई वसाहतीमध्ये किरकोळ वादातून तिघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमी तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही घटना ११ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. प्रथमेश उर्फ आशिष घडे (१९), क्रिश उर्फ केदार चव्हाण (१८) आणि गणेश वायदंडे (१९) या तिघांनी मिळून फिर्यादीवर हल्ला केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून हल्ल्यामागील नेमकं कारण शोधले जात आहे.
पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ₹१.५ लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास ( Pune Crime News 13 June 2025)
सार्वजनिक बसमधील गर्दीचा फायदा घेत एका ज्येष्ठ महिलेला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने ₹१,५०,००० किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
६९ वर्षीय महिला वडगाव बुद्रुक येथून शनिपार चौकाकडे बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्या. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Pune: मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो – संजय शिरसाट
लोहियानगरमधील बंद घरातून ₹१.२८ लाखांचा ऐवज लंपास ( Pune Crime News 13 June 2025)
लोहियानगर परिसरातील एका महिलेला घरातील उघड्या दरवाज्याचा फायदा घेत चोरट्याने घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹१,२८,००० रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे.
१२ जूनच्या मध्यरात्री ते सकाळी दहाच्या दरम्यान चोरट्याने घरात प्रवेश करून बॅगेतील ₹२३,००० रोख व सोन्याचे दागिने चोरले. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धायरीत अपघातानंतर पळालेल्या दुचाकीस्वारामुळे वडिलांचा मृत्यू ( Pune Crime News 13 June 2025)
धायरी परिसरात भरधाव वेगात दुचाकी चालवत एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला.
ही घटना १० जून रोजी रात्री ९ वाजता आर्टिको लिफ्ट कंपनीसमोर घडली. धडक दिल्यानंतर आरोपीने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळ सोडून दिली. नांदेड सिटी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.