Team MyPuneCity – वारजे परिसरातील दर्या बारसमोरील मोकळ्या जागेत तिघांनी एकत्र येऊन दारू पिऊन गोंधळ घालू नकोस, असे सांगणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला लोखंडी हत्यार आणि बियरच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. ही घटना ९ जूनच्या मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ( Pune Crime News 10 June 2025) घडली.
फिर्यादी तरुण आपल्या मित्रासह वॉशरुमसाठी गेला असताना, आदित्य अशोक मारणे (३०, रा. श्रीरामकृपा अपार्टमेंट, दत्तनगर, वारजे), विकी गेंदालाल करंजाळे (३०, रा. सद्गुरु प्रेस्टीज, उत्तमनगर, पुणे) व त्यांच्यासोबत असलेल्या एक साथीदाराने त्याला शिवीगाळ करत हातातील बाटली आणि लोखंडी हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी विकी करंजाळेला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गॅस कनेक्शन कट होणार म्हणून ५७ वर्षीय महिलेला ७ लाख रुपयांना गंडा ( Pune Crime News 10 June 2025)
MNGL गॅस कनेक्शन कट होणार असल्याचं भासवत, एका ५७ वर्षीय महिलेला ऑनलाईन माध्यमातून तब्बल ७ लाख ४ हजार ३३२ रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ही फसवणूक ३० जून २०२४ ते १ जुलै २०२४ दरम्यान घडली.
कोंढवा परिसरात राहणाऱ्या महिलेचा विश्वास संपादन करून, अज्ञात मोबाईल धारकाने तिच्याकडून बँक खात्यावर पैसे वर्ग करून घेतले. आरोपीने MNGL कंपनीकडून संपर्क असल्याचा बनाव करून आर्थिक फसवणूक केली.
फसवणूक करणाऱ्या मोबाईल व बँक खातेधारकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सायबर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा शोध सुरू आहे.
पाषाण परिसरात घरफोडी; ५.४३ लाखांचा ऐवज लंपास ( Pune Crime News 10 June 2025)
पाषाण परिसरातील बाणेर सुतारवाडी येथील मुक्ता रेसिडेन्सीमधील एका बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून ५ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ७ जून ते ९ जून २०२५ या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादी ३४ वर्षीय तरुण काही काळासाठी बाहेर गेल्याने त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ८,५०० रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
डेक्कन परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावला ७० हजारांचा मोबाईल ( Pune Crime News 10 June 2025)
डेक्कन परिसरात पाषाणमधील एका २१ वर्षीय तरुणाकडून दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी हातातील मोबाईल हिसकावून चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना ९ जूनच्या मध्यरात्री १२.३० ते १२.४५ दरम्यान संदिप हॉटेलसमोरील रस्त्यावर घडली.
तरुण रस्त्यावर उभा असताना, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील ७०,००० रुपये किंमतीचा मोबाईल फोन झडप घालून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.