Team MyPuneCity –चिखली परिसरातील ३५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू डेक्कन परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ८ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचे नाव अजून उघड करण्यात आलेले नाही. पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
जंगली महाराज रोडवर दुचाकीवरून हिसकावला मोबाईल
जंगली महाराज रोडवरील शाही भोज रेस्टॉरंटजवळ एका पादचाऱ्याच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जबरदस्तीने १७,००० रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार घडला.
ही घटना ८ जून रोजी रात्री २.१० ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पाठीमागे बसलेल्या इसमाने मोबाईल खेचून घेतल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. या प्रकरणात आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वारजेतील भंगार दुकानदारास व त्याच्या कुटुंबीयास मारहाण करून जबरी चोरी
वारजे माळवाडीतील तपोधाम परिसरात भंगार दुकानदार व त्याच्या कुटुंबीयावर टोळक्याने हल्ला करत सुमारे ४५,७०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.
Lohgad: लोहगड भाजे रस्ता रुंदीकरणा अभावी जाम ..पर्यटक त्रस्त..
या प्रकरणी आशितोष नारायण साठे (२२), ओम सचिन वनकुद्रे (१९), सुमित दिपक तावडे (२०), वेदांत राजेंद्र भास्कर (२४) आणि पॉलजेरॉल्ड फर्नाडीस (२९, अटक) अशी आरोपींची नावे असून, दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने हा वाद निर्माण झाला. आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मुलांवर हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याची साखळी हिसकावून घेतली. पोलिसांनी एकाला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सहकारनगरमध्ये भरधाव टँकरची मोटारसायकलला धडक; महिलेचा मृत्यू
सहकारनगरमधील चव्हाणनगर कमान चौकात भरधाव टँकरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ३१ वर्षीय रुमी अजित पाल यांचा मृत्यू झाला.
ही घटना दि. ७ जून रोजी रात्री ११.२५ वाजता घडली. अपघातात फिर्यादी अजित पाल व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. टँकर चालकाने अपघातानंतर थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याने अधिक संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रभात रोडवरून १ लाख १७ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरी
डेक्कन परिसरातील प्रभात रोडवरील गल्ली नंबर १२ येथून साडेचार फूट उंचीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी कापून चोरले.
ही घटना ४ जूनच्या पहाटेच्या सुमारास घडली. झाडाची किंमत सुमारे १,१७,००० रुपये असून झाड कोणत्यातरी धारदार वस्तूच्या सहाय्याने कापण्यात आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजेतील घरफोडी; ३.५ लाखांचे दागिने चोरीला
वारजेतील ब्रह्मचैतन्य सोसायटीजवळील आशीर्वाद बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे ३.५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
ही घटना २५ फेब्रुवारी ते ५ जून दरम्यानच्या कालावधीत घडली. फिर्यादी महिला घरी नसताना चोरट्यांनी उघड्या दारातून प्रवेश करून कपाटातील दागिने लंपास केले. पोलीस तपास करत आहेत.
पुणे स्टेशनजवळ दुचाकीवरील दोघांकडून मोबाईल चोरी
पुणे रेल्वे स्टेशनजवळील अलंकार चौकात एका व्यक्तीकडील ८ हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
८ जून रोजी पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
वाघोलीत विवाहितेचा छळ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवऱ्यास अटक
वाघोली येथील ओम निवारा बिल्डिंगमध्ये २० वर्षीय विवाहितेने सासरी छळाला कंटाळून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती सूरज पाठक (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिला माहेराहून पैशांची मागणी करून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. तिचा पती सुरज राजेंद्रप्रसाद पाठक (२६) याला अटक करण्यात आली आहे.