Pune Crime News 05 May 2025:हडपसरमध्ये अपघातात महिलेचा मृत्यू; काॅंक्रीट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा

Published On:
Crime 1
---Advertisement---

Team MyPuneCity – मांजरी येथील झेड कॉर्नरजवळील (Pune Crime News 05 May 2025)तुपे कॉर्नर खाऊ गल्लीसमोर ४ मे रोजी दुपारी एक भीषण अपघात घडला. ब्रम्हशंकर पांडे (वय ३९, रा. केशवनगर, पुणे) हे त्यांच्या पत्नी रेणु पांडे (वय ३८) यांच्यासह मोटारसायकलवरून जात असताना, त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या काॅंक्रीट मिक्सरने जोरदार धडक दिली. या अपघातात रेणू पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गांघले करीत आहेत.

शिवाजीनगरमध्ये सोन्याची चेन घेऊन पसार; ग्राहक बनून आलेल्या चोराचा प्रकार

तनिष्क ज्वेलर्स, एम. रोड, शिवाजीनगर येथे ३ मे रोजी दुपारी साडेअकरा वाजता एक अनोळखी व्यक्ती ग्राहक बनून दुकानात आला. त्याने सोन्याची चेन निवडली व ती मोजण्यासाठी दुसऱ्या काउंटरकडे पाठवण्याचा बहाणा करत सेल्सगर्लचा विश्वास संपादन केला. या संधीचा फायदा घेत, त्या काउंटरवर कोणी नसताना त्याने २ लाख ६० हजार रुपयांची सोन्याची चेन लंपास केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.

कात्रज बायपासवर अपघात; आईचा मृत्यू, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

कात्रज बायपास रोडवर वंडर सिटीसमोर ४ मे रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास झालेल्या अपघातात लहुबाई अश्रुबा वाघमारे (वय ४९, रा. आंबेगाव खुर्द) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुली प्रियांका राऊत यांनी फिर्याद दिली असून ट्रकने त्यांच्या आई चालवत असलेल्या मोपेडला जोरदार धडक दिली. ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवण्यात आला होता. ट्रक चालक फरार असून अटक करण्यात आलेली नाही. आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी करत आहेत.

Sunil Shelke: आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- सुनील शेळके

वडगाव बुद्रुक येथे झटापटीनंतर सोनसाखळी चोरी; तिघांविरुद्ध गुन्हा

वडगाव बुद्रुक येथील डी व्हीसटेरीया पार्कसमोर ३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका २७ वर्षीय तरुणाला अडवले. “आमच्या अंगावर का धडकलास?” असा सवाल करत त्याच्याशी झटापट केली आणि गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.

येरवडा येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

डॉन बॉस्को शाळेसमोरील खाऊ गल्लीसमोरील दुकानाजवळ ४ मे रोजी पहाटे सहा वाजता निखिल खेडकर (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) या तरुणाने दुचाकी निष्काळजीपणे चालवली व नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखडे करत आहेत.

बाणेरमध्ये विश्वासघात; वृद्ध नागरिकाची दीड महिन्यात ५० लाखांची फसवणूक

पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर येथील सुप्रीम अ‍ॅगडोर इमारतीतील फ्लॅटमध्ये २७ फेब्रुवारी ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत एका ५४ वर्षीय व्यक्तीची अंदाजे ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेनं विश्‍वास संपादन करून विविध प्रकाराने पैशांची उकळपट्टी केली. बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

Follow Us On