Team MyPuneCity – मोबाईलवर एपीके फाईल पाठवून केवायसी अपडेटच्या बहाण्याने एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ६ लाख १८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी ऑनलाइन माध्यमातून घडली ( Pune Crime News 02 June 2025) होती.
कोथरुड येथे राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईल धारकाने त्यांना केवायसी अपडेटसाठी एपीके फाईल पाठवली. ती फाईल डाऊनलोड करताच रिमोट अॅक्सेस प्राप्त करून आरोपीने त्यांच्या खात्यातून तब्बल ६,१८,२९८ रुपयांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेत नाही.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हडपसरमध्ये टोळक्याचा हल्ला : तरुणावर हत्याराने मारहाण करून दहशत ( Pune Crime News 02 June 2025)
पुणे – हडपसरच्या रामटेकडी परिसरात ‘तू तुझ्या मित्राबरोबर का फिरतोस’ या कारणावरून एका तरुणाला टोळक्याने हत्यार व दगडाने जबर मारहाण केली. या घटनेत एक आरोपी अटकेत असून इतर सहा फरार आहेत.
ही घटना ३१ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. फिर्यादी तरुणास टोळक्याने घेरून मारहाण करत धमकी दिली आणि परिसरात दहशत निर्माण केली. महेश विकास शिंदे (वय २०, रा. रामटेकडी, हडपसर) याला अटक करण्यात आली असून सहा आरोपी फरार आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव करत आहेत.
भवानी पेठेत बंद घरातून अज्ञात चोराने सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली ( Pune Crime News 02 June 2025)
पुणे – भवानी पेठ येथील ओवेरा इन्क्लेव्हमध्ये बंद फ्लॅटमधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे ८०,५०० रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
३१ मे रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी ३.३० या वेळेत घर कुलूप लावून बंद असताना, अज्ञात व्यक्तीने खिडकीतून घरात प्रवेश करून कपाटातील रोकड व सोन्याचे दागिने चोरले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलीस अंमलदार तुळसुळकर करत आहेत.
मांजरी रोडवर रिक्षाची वाट पाहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले ( Pune Crime News 02 June 2025)
पुणे – मांजरी रोडवरील इंडियन ऑईल पंपजवळील कलाश्री बँक्वेट हॉलजवळ रिक्षाची वाट पाहत असलेल्या ५७ वर्षीय महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गाठले आणि गळ्यातील ७५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
ही घटना ३१ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करत आहेत.
स्वारगेट बस डेपोमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स लंपास ( Pune Crime News 02 June 2025)
पुणे – स्वारगेट बस डेपोमध्ये पीएमपीएमएल बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने एका महिलेच्या बॅगेतील सुमारे ६९,५०० रुपयांचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरी केला.
ही घटना १ जून रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
वाळवेकरनगरमध्ये ६४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वाराने हिसकावले ( Pune Crime News 02 June 2025)
पुणे – वाळवेकरनगर येथील अनिलकुंज बंगल्याजवळून पायी जात असलेल्या ६४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील १ लाख ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने हिसकावून पळ काढला.
ही घटना १ जून रोजी रात्री ८.२० वाजता घडली. फिर्यादी आपल्या पतीसोबत पायी जात असताना ही जबरी चोरी करण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करत आहेत.