डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर’ पुस्तकाचे प्रकाशन
Team My Pune City -आजच्या काळात विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवून विविध विषयात कौशल्यविकास साधणे आवश्यक आहे. या करिता डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘ करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. मातृभाषेतून लिखाण हा दृष्टीकोन अभिमानास्पद असून करिअरमधील विविध क्षेत्रांविषयी तज्ज्ञ लेखकांनी मांडलेली माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
विश्वास प्रकाशनतर्फे प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. गणेशखिंड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात आज (दि. 15) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यावाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, ज्येष्ठ संशोधक डॉ. अरविंद नातू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, विश्वास प्रकाशनच्या संचालिका वैशाली कार्लेकर मंचावर होते.
Alandi:आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमची पाहणी:स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन
Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
पुस्तकाविषयी माहिती सांगताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, करिअर दिशा..’ या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयातील करिअरच्या संधींविषयी तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाच्या बरोबरीने विविध विषयातील कौशल्यविकास साधणे तसेच शिक्षण घेत असतानाच कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना डॉ. अरविंद नातू म्हणाले, आजच्या शिक्षणात संशोधनाचा अभाव जाणवतो. मुलांना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात कार्य करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. त्या करिता आंतरशाखीय शिक्षण उपयुक्त ठरेल.
करिअरच्या संधी शोधण्यासाठी ‘करिअर दिशा.. दहावी-बारावीनंतर’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी व्यक्त केला. पुस्तकातील लेख अभ्यासपूर्ण असल्याचे डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी तर सूत्रसंचालन वैशाली कार्लेकर यांनी केले. आभार डॉ. शुभांगी भातांब्रेकर यांनी मानले.