Team My Pune City – शेअर बाजारात आकर्षक परताव्याचे (Pune)आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर परिसरातील एका व्यावसायिकाची तब्बल ९७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचा पथक तपास करत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या तक्रारदार व्यावसायिकाच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी संदेश पाठवला. “शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल” असे आमिष दाखवून त्यांनी त्यांना समाजमाध्यमावरील एका गुंतवणूक गटात सामील करून घेतले. त्या गटात विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली जाऊ लागली.
सुरुवातीला व्यावसायिकाने अल्प रक्कम गुंतविली असता, परताव्याचे खोटे दाखले गटात दाखवले गेले. परतावा मिळत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चोरट्यांनी वारंवार मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणला. विश्वास बसल्याने तक्रारदाराने गेल्या पाच ते सहा महिन्यांत वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ९७ लाख ५० हजार रुपये गुंतविले.
मात्र, अपेक्षित परतावा मिळाला नाही. उलट चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेरीस मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असून, अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.