शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण
‘नाचून नाही, तर वाचून’च गणेशोत्सव साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार
Team My Pune City –‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’ ( Pune)हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी संवाद, पुणे आणि वृद्धी रिॲलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचा आज (दि. 31) समारोप झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी ‘नाचून नाही, तर वाचून’च गणेशोत्सव साजरा करू असा निर्धार केला.
बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, श्रीगणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन या निमित्ताने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला असंख्य पालकांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. यात पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धांची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण कलादालनात झाल्यानंतर पारितोषिक वितरण बालसाहित्यकार राजीव तांबे, वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
राजीव तांबे यांनी या वेळी विद्यार्थ्यांशी गोष्टी सांगत संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना दाद द्या, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या अभिनव उपक्रमाचे अमोल शहा यांनी कौतुक केले. या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत मुलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे नवी उर्जा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.