Team MyPuneCity –आपल्या आजूबाजूला सतत वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात तसे ते जातही असतात. कधी कार्बोहायड्रेट खाऊ नका, कधी जेवणातील फॅट्स टाळा, ग्लुटेन टाळा, कधी केवळ प्रोटीन्सचा आहार वाढवा असे सल्ले अनेकवेळा दिल्या जातात. मात्र, शाश्वत जीवनशैलीसाठी पारंपारिक पद्धतीने बनविलेला आणि आपल्याला माहिती असलेला संतुलित आहार महत्त्वाचा असल्याने त्याची कास धरा असा सल्ला प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला. पुण्यातील पी एम शहा फाऊंडेशन यांच्या वतीने विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित कार्यक्रमात दिवेकर बोलत होत्या. शंका कुशंकांचा हा अन्नविषयक संघर्ष संपायला हवा असे स्पष्ट मतही दिवेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
पी एम शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी, ज्योतिचंद भाईचंद ज्वेलर्सच्या मुकुलिका शहा, पी एम शहा फाऊंडेशनच्या सरस्वती मेहता यावेळी उपस्थित होत्या. मुकुलिका शहा यांच्या हस्ते यावेळी ऋजुता दिवेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान दिवेकर यांच्या ‘दि कॉमनसेन्स डाएट’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ देखील यावेळी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या निवेदिका वसुंधरा काशीकर आणि आयोजक ॲड. चेतन गांधी यांनी दिवेकर यांच्याशी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात यावेळी संवाद साधला.
कार्यक्रमा दरम्यान बोलताना ऋजुता दिवेकर म्हणाल्या, “प्रत्येक महिलेने केवळ वयाच्या चाळीशीनंतर स्वत:ची काळजी घ्यायची हा समज आता दूर व्हायला हवा आहे. घरातील प्रत्येक महिलेने जन्मापासूनच स्वत:ची काळजी घ्यायला हवी आहे. महिलांनी को-ऑपरेशन, कोलॅबोरेशन आणि कॉम्प्रमाईज यामध्ये आयुष्यभर अडकून न पडता स्वत:कडे लक्ष द्यायची गरज आहे. चाळीशीनंतर केवळ आपण सेल्फीमध्ये बारीक दिसतो का हे महत्त्वाचे नसून आपण किती निरोगी आहोत याला महत्त्व देणे गरजेचे आहे.”
बारीक असणे म्हणजे निरोगी असणे हा समज चुकीचा आहे असे स्पष्टपणे सांगत ऋजुता दिवेकर पुढे म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांत पुरुषांचा स्वयंपाक घरातील सहभाग कमी झाला असून तो वाढायला हवा. याबरोबरच पूर्णान्न समाजाला जाणाऱ्या भाताचे पहिल्यासारखे जेवणातील स्थान त्याला परत द्यायला हवे आहे. शिवाय चांगला पाहुणचार करीत अतिथी देवो भावो या भावनेने पाहुण्यांना समाधानाने खाऊ पिऊ घालायला हवे या गोष्टी जुन्या काळासारख्या परतायला हव्यात असे मला वाटते.” कधीही अन्न ग्रहण करताना ते मनात किंतु ठेवून ग्रहण करू नका, अन्न नाकारू नका कारण अन्नाच्या माध्यमातून तुम्ही नकळतपणे प्रेम नाकारता असेही दिवेकर म्हणाल्या.
Pune: वाहनचोरांचा पर्दाफाश : दोन आरोपींकडून दोन रिक्षा व एक दुचाकी जप्त
नेहमी स्थानिक, त्या त्या ऋतूत उपलब्ध असलेले आणि पारंपारिक अन्न, पदार्थांना प्राधान्य द्यायला हवे. अन्न जेवढा दूरचा प्रवास करून तुमच्या ताटात येईल तेवढे तुमचे पोट तुमच्यापासून लांब जाईल, त्यामुळे स्थानिक पदार्थांचा समावेश जेवणात असायला हवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
‘फ्युजन फूड’ हे कन्फ्युजिंग आहे असे सांगत दिवेकर पुढे म्हणाल्या, “आपल्याकडे पारंपरिक पदार्थाला ट्विस्ट करत काहीतरी भलतेच बनवले जाते पण तसे न करता पारंपारिक पद्धतीने पदार्थ बनवा. जेवताना टीव्ही, मोबाईल दूर ठेवा आणि आपल्याला आवश्यक तेवढे अन्न उपलब्ध होत आहे याबद्दल कृतज्ञ रहा. आपल्या आहाराविषयी कॉमनसेन्स जागृत ठेऊन त्याचे सेवन करा.” आपल्या पारंपारिक आहारात सर्व गोष्टींचा समावेश आहे मात्र, त्याचे असायला हवे तेवढे महत्त्व आपण मानत नसल्याचे दिवेकर यांनी सांगितले.
घरातील महिला या इतरांना सातत्याने काहीनाकाही सांगत असतात मात्र त्या केवळ ऋजुता दिवेकर यांचे ऐकतात. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करणारे एक मराठी नाव म्हणून ऋजुता दिवेकर यांचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांचा वर्षानुवर्षांचा अभ्यास आणि अनुभव त्यांच्या बोलण्यातून दिसतो असे ॲड. चेतन गांधी प्रास्ताविक करताना म्हणाले.
झाडांची पोषणाची गरज त्यांची मुळे पूर्ण करतात, तशी कुटुंबाची पोषणाची गरज ही कुटुंबातील महिला पूर्ण करते. त्यामुळे तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. महिलांनीही स्वत:ची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मुकुलिका शहा म्हणाल्या.