Team MyPuneCity -नाट्यक्षेत्रात संस्थात्मक पातळीवर प्रशिक्षण घेण्यावर आता लोकांचा विश्वास बसू लागला आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान मिळत असून कलाकाराने प्रयत्न सुरू केल्यास त्याला आपोआपच मार्ग सापडत जातो. एकरेषीय विचार करण्याऐवजी विविध वाटा चोखाळाव्यात. कलाकाराच्या स्वभावात प्रयोगशीलता असावी तसेच त्याने स्वत:च्या मनाचा कौल घेत सातत्याने कार्यरत रहावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी केले.
संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आयोजित ‘नाटक व रंगभूमी क्षेत्रात करियर करण्यातलं नाट्य’ या विषयावर आज (दि. 14) बालगंधर्व कलादालनात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात अभिराम भडकमकर बोलत होते. सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व अभिनेते अमित वझे, सुप्रसिद्ध अभिनेते गजानन परांजपे यांचा सहभाग होता.
अभिराम भडकमकर पुढे म्हणाले, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा अशा रंगभूमीला पूरक विषयांचेही कलाकाराने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नाट्यक्षेत्रात करिअर करताना अंधारात उडी मारण्याचा काळ आता राहिलेला नाही.
गजानन परांजपे म्हणाले, मी नाटकाचे अनौपचारिक शिक्षण घेतले आहे. त्यामुळे अनेक माध्यमातून नाट्यविषयाला निगडित पूरक गोष्टींचे प्रशिक्षण मला सहजतेने मिळत गेले. चमकण्याची हौस प्रत्येक कलाकारालाच असते पण एक वेळ अशी येते की, नेमके काय करायचे, आपल्या जबाबदाऱ्या काय, आत्मिक आनंद मिळतो का याविषयी निर्णय घ्यावाच लागतो.
Pune: संगीत क्षेत्रात आज करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध
अमित वझे म्हणाले, आनंदासाठी काम करताना पोटाची खळगी भरल्याशिवाय आनंद उपभोगता येत नाही. आज नाटकाला चांगले दिवस आले आहेत. प्रेक्षक पुन्हा एकदा नाटकांकडे वळू लागला आहे. त्यामुळे नाटकाकडे करिअर म्हणून पहायला हरकत नाही. नाटक करत असतानाच नाट्य क्षेत्रातील इतर कौशल्येही आत्मसात करावीत. वयाच्या 20 ते 30 वर्षे या कालावधीत विद्यार्थ्याने टीप कागदाप्रमाणे विविध पैलू ग्रहण करत, कष्टाने लक्ष केंद्रीत करून ज्ञान मिळवत राहणे महत्त्वाचे आहे. कारण जेवढे ज्ञान आत साठेल तेवढ्या प्रमाणात कलाकार प्रकाशमान होईल. या क्षेत्रात करिअर करताना स्वत:ला आवडणारे की लोकांना आवडणारे काम करावे याचा निर्णय घेताना स्वत:चा स्वभाव ओळखून, स्वत:ला दोषी न मानता निर्णय घ्यावा.