Team MyPuneCity –फुरसुंगी परिसरात आढळलेल्या एका अनोळखी इसमाच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व खडतर तपास करून अवघ्या तीन दिवसांत मारेकऱ्याचा छडा लावत त्याला लातूर येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांनी अजून एक खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.
दि. १० मे २०२५ रोजी फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मृताच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या होत्या. पोलिसांनी त्वरित तपास करून मृताची ओळख हनिफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे) अशी पटवली होती. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Pune Crime News: बाणेरमधील दोन मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसाय उघड, सहा आरोपींवर गुन्हे दाखल
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेच्या युनिट ५ व ६ यांनी समांतर तपास सुरू केला. या तपासात ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. या तपासात आरोपी आसिफ युनूस शेख (वय २५, रा. गल्ली नं. ५, सय्यदनगर, हडपसर, पुणे) यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा घडल्यानंतर तो आपल्या मूळगावी शास्त्रीनगर, लातूर येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने तेथे जाऊन त्याला अटक केली.
दि. १३ मे २०२५ रोजी पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार प्रताप गायकवाड व पोलीस अंमलदार अकबर शेख यांचे पथक लातूरला रवाना करण्यात आले होते. त्यांनी आरोपीला शास्त्रीनगर, लातूर येथून अटक करून पुणे येथे आणले. चौकशीत आरोपीने जुन्या वादातून हनिफ शेख याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी त्याला फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, पो. अं. शेखर काटे, गणेश डोंगरे, नितीन घाडगे, तसेच युनिट ५ मधील स. फौज. राजस शेख, पो. हवा. तानाजी देशमुख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अकबर शेख, अमित कांबळे, संजय दळवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.