संवाद पुणे, पायलवृंद आणि कलांगणतर्फे दिवाळी पाडव्याची विशेष भेट…
Team My Pune City –खुमासदार, खुसखुशीस, खमंग किस्से तसेच मनमोकळ्या गप्पा (Pune)आणि सुमधुर गाण्यांन पुणेकर रसिकांना दिवाळी पाडव्याची अनोखी भेट मिळाली. निमित्त होते सिने-नाट्यसृष्टीतील तारे-तारकांबरोबर दिलखुलास गप्पा आणि संसारातील गोडी खुलविणाऱ्या गीतांची विशेष मैफल ‘जोडी तुझी माझी’ या कार्यक्रमाचे. या आनंददायी मैफलीने रसिकांची दिवाळी पाडव्याची गोडी वाढविली.
संवाद पुणे, पायलवृंद यांचे आयोजन आणि कलांगणची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमात डॉ. गिरीश ओक आणि पल्लवी ओक तसेच संजय मोने व सुकन्या कुलकर्णी यांच्याशी मिलिंद कुलकर्णी मनमोकळा संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Pune : लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच चोरी! पूजेत ठेवलेले १९ लाख ८८ हजारांचे दागिने व रोकड लंपास
Nakul Bhoir Murder : घरगुती कलहातून सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीने केला खून
बालपणातील अनेक किस्से, घरातून लाभलेले संस्कार, संसारातील अनेक कडू-गोड आठवणी, कलाकार म्हणून झालेली जडण-घडण, सहकलारांशी असलेले नाते, नाटकांच्या प्रयोगादरम्यान घडलेले गंमतशीर प्रसंग, सहकलाकार म्हणून एकत्र काम करत असताना सहवासातून निर्माण झालेले ऋणानुबंध अशा विविध रंगतदार आठवणी आणि किश्शांमधून उलगडत गेलेले प्रसंग रसिकांनी मनमुराद दाद देत अनुभवले. डॉ. गिरीश ओक यांनी ‘बादल बिजली चंदन पानी ऐसा अपना प्यार’ हे गीत आणि ‘पाहिली मुंबई’ हा पोवाडा तयारीने सादर केला तर संजय मोने यांनी डॉ. गिरीश ओक यांच्या पुस्तकाला स्वत: लिहिलेल्या प्रस्तावनेचे प्रभावीपणे वाचन केले. रसिकांनी यास भरभरून दाद दिली.
या सुमारे तीन तास रंगलेल्या गप्पांच्या मैफलीत याच कलाकरांनी फर्माईश केलेली ‘गगन सदन तेजोमय’, ‘मर्म बंधातली ठेव ही’, ‘पाहिले न मी तुला’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘का कळेना’, ‘आईये मेहेरबा’, ‘आपकी आँखे मे कुछ’, ‘कुछ न कहो’, ‘तेरे मेरे सपने’ आदी मराठी-हिंदी चित्रपटगीते बहारदारपणे सादर करून गायकांनी मैफलीत रंगत भरत कार्यक्रमाची सांगता ‘अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नही’ या गाण्याने केली. तेव्हा कलाकारांसह रसिकांनीही ‘‘खरच अजून मन भरले नाही, खूप बोलायचे, सांगायचे आणि ऐकायचे राहिले’’ असे म्हणत ही मैफल अशीच सुरू राहावी अशी इच्छा व्यक्त केली.
पुण्यातील नामवंत गायक चैत्राली अभ्यंकर, संजीव मेहेंदळे, अक्षय घाणेकर यांनी संसारातील गोडी वाढविणाऱ्या अनेक सुमधुर गीतांचे बहारदार सादरीकरण केले. गायकांना ओंकार पाटणकर, राजेंद्र हसबनीस, संजय खाडे यांनी समर्पक साथसंगत करून कार्यक्रमाची गोडी वाढविली. सुप्रसिद्ध की-बोर्ड वादक विवेक परांजपे यांचे वाद्यवृंदाचे नेटके संयोजन केले.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची निर्मिती सुनील महाजन यांची होती तर निकिता मोघे सूत्रधार होत्या. संयोजन केतकी महाजन-बोरकर यांचे होते.


















