Team My Pune City – शहरातील बुधवार पेठ येथील श्री जोगेश्वरी मंदिरासमोरील इमारतीतील एका फ्लॅटमध्ये( Pune )कीटकनाशक फवारणीनंतर विषारी वायूमुळे श्वास गुदमरून एका २६ वर्षीय प्रशिक्षणार्थी पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.21) दुपारी उघड झाली असून, विश्रांबाग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू (ADR) ची नोंद करण्यात आली आहे.
मृताचे नाव रवींद्र बाबन जाधव (वय २६, रा. इंदापूर, जि. पुणे) असे असून, तो सध्या सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होता. दिवाळी सुटीदरम्यान तो पुण्यातील एका मित्राला भेटण्यासाठी आला होता. संबंधित मित्र बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोरील सोसायटीत राहतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधवचा मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, दोघेही त्या फ्लॅटमध्ये राहात होते. मंगळवारी सकाळी जाधवने विश्रांती घेण्यासाठी खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. दुपारी त्याचे मित्र त्याला फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता जाधव बेशुद्ध अवस्थेत आढळला.
त्याला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच विश्रांबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समोर आले की, काही वेळापूर्वीच त्या फ्लॅटमध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली होती. त्यामुळे जाधवचा मृत्यू विषारी वायूंच्या परिणामामुळे श्वास गुदमरल्याने झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
“मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल,” अशी माहिती विश्रांबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली.
Bavdhan Khurd:मल्टीनॅशनल IT कंपनीचे करोडोंचे फसवणूक प्रकरण उघड : ७५ अभियंत्यांना नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची लूट
Talegaon: तळेगाव ग्रामीण व गणपती मळा येथे प्रशांत दादा भागवत व मेघाताईंच्या उपस्थितीत साजरी झाली भाऊबीज; प्रेम, स्नेह आणि विकासाचा दीप पेटला!
या प्रकरणी विश्रांबाग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, घटनास्थळावरील वस्तू, कीटकनाशकाचा प्रकार आणि फवारणीची वेळ याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे.