Team My Pune City – रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) (Pune)जवानांनी राबविलेल्या विशेष ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेतून दोन दिवसांत तब्बल १४ अल्पवयीन मुलांना पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले आहे. कौटुंबिक वाद, मित्रांच्या सल्ल्याने किंवा पालकांना न सांगता घरातून पळून आलेली ही मुले स्थानक परिसरात भटकताना आढळली. तातडीने या मुलांना समुपदेशनासाठी बाल कल्याण समितीकडे (चाइल्ड वेल्फेअर कमिटी) सोपविण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
आरपीएफचे निरीक्षक सुनील यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे विभाग, चाइल्ड हेल्पलाइन पुणे आणि स्थानिक समाजसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (१९ सप्टेंबर) पुणे रेल्वे स्थानकात गस्त घालत असताना आठ अल्पवयीन मुले वारंवार फलाटांवर भटकताना दिसली. चौकशीत या मुलांनी घर सोडण्यामागे मित्रांचा दबाव, तसेच कौटुंबिक कारणे असल्याचे सांगितले. त्यांना तातडीने येरवडा येथील बाल कल्याण समितीकडे समुपदेशनासाठी सोपविण्यात आले. यातील सात मुलांना ‘साथी सेवा’ संस्थेत तर एका मुलाला ‘साई सेवा ओपन शेल्टर’ येथे ठेवण्यात आले आहे.
यानंतर शनिवारी (२० सप्टेंबर) पुन्हा अशाच प्रकारे सहा मुले स्थानक परिसरात आढळली. त्यांनाही ताब्यात घेऊन सामाजिक संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित मुलांचे समुपदेशन सुरू असून पालकांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. पालकांचा संपर्क होताच चौकशी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येईल, असे आरपीएफ निरीक्षक यादव यांनी स्पष्ट केले.
Pune: ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२५ – २७ सप्टेंबरला; विद्यार्थी व पालकांसाठी मोफत प्रवेश
Talegaon Dabhade: मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदाही कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुली अव्वल


या कारवाईनंतर प्रियांका शर्मा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, पुणे विभाग यांनी पालकांना आवाहन केले की, “लहान मुलांवर वेळोवेळी लक्ष ठेवणे आणि त्यांच्यासोबत संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक वादांमुळे किंवा मित्रांच्या दबावाखाली मुले घर सोडून जाण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशा वेळी पालकांनी संवेदनशीलतेने मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.”
दोन दिवसांत तब्बल १४ अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षितपणे पुनर्वसनाच्या दिशेने नेण्यात आरपीएफ, जीआरपी व सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे ठरले आहे.