वासवानी मिशन, पुणे चा सहभाग ; जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत शिबीर
Team MyPuneCity –श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले. सणस मैदानासमोरील सजावट विभागात राज्यातील १०३ दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले. साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठातील स्वित्झर्लंड येथील शास्त्रज्ञ सॅबिन कुराटली, स्पेन येथील शास्त्रज्ञ डेव्हिड पोलिडो तसेच साधू वासवानी मिशन चे महाव्यवस्थापक सुंदर वासवानी यांसह ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील या शास्त्रज्ञांचा कोविशील्ड ही कोविड मधील लस बनविण्यात महत्वाचा सहभाग होता. त्या शास्त्रज्ञांनी शिबिरात येण्यापूर्वी मंदिरात श्रीं चे दर्शन देखील घेतले आणि ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली.
डेव्हिड पोलिडो म्हणाले, ज्याप्रमाणे आमचे येथे आदरातिथ्य झाले, त्याकरिता आम्ही आभारी आहोत. समाजासाठी सुरु असलेले हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
Pune People’s Bank : पुणे पीपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा मंगळवारी रौप्य महोत्सव सोहळा

शिबीरात आलेल्या सुमन मरगळे म्हणाल्या, माझ्या मुलीला चालता येत नव्हते. यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून माझ्या मुलीची तपासणी करून चालण्याकरिता रॉड देण्यात आले आहेत. यामुळे मला खूप मदत झाली असून मुलीला चालण्यासाठी सहकार्य होणार आहे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत विविध प्रकारच्या सुविधा आपण रुग्नांना देत असतो. शिबीरात कृत्रिम हात, पाय, कुबड्या दिव्यांगांना देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत ६ हजार ८०० रुग्णांना कृत्रिम अवयव देण्यात आले असून, त्यांचे जीवन अतिशय सुकर व आनंददायी झाले आहे.