Team My Pune City – पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी (PMPML) वाहतूक व्यवस्थेला नवा वेग देणारी आनंदवार्ता! केंद्र सरकारने पंतप्रधान ई-ड्राईव्ह (PM-E Drive) योजनेअंतर्गत पुणे शहरासाठी तब्बल 1000 ई-बस खरेदीला अंतिम मंजुरी दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं असून, या निर्णयामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणूक आघाडीसोबतच लढणार — प्रशांत जगताप
या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन, हवेच्या प्रदूषणावरही प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे. पीएमपीएमएलच्या (PMPML) ताफ्यात नव्या ई-बस दाखल झाल्यानंतर नागरिकांना स्वच्छ, शांत आणि शाश्वत प्रवासाचा अनुभव मिळेल.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रस्तावासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पीएमपीएमएलमार्फत पाठवलेल्या 1000 ई-बसच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून तातडीने मंजुरी मिळाली आहे. मोहोळ म्हणाले, “ही मंजुरी केवळ पुणेकरांसाठीच नव्हे तर पर्यावरणपूरक भारताच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ई-बस ताफा वाढल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक विश्वासार्ह आणि स्वच्छ होईल.”
या योजनेअंतर्गत नव्या ई-बस लवकरच पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सशक्त होईल आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. शहरातील प्रदूषणात घट आणि प्रवासाच्या वेळेत बचत — या दोन्हींचा लाभ थेट पुणेकरांना मिळेल.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील शाश्वत विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 1000 ई-बसच्या मंजुरीमुळे पुणेकरांच्या प्रवासाला नवी दिशा, आणि शहराला स्वच्छ-हरित भविष्याची नवी उभारी मिळणार आहे.
7

















