Team My Pune City – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ( PMPML (पीएमपी) बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे फेऱ्यांवर परिणाम असून, प्रवाशांना वाटेत गैरसोयीचा फटका बसत आहे. त्यामुळे पीएमपीकडून ‘शून्य बंद (झीरो ब्रेकडाऊन)’चे लक्ष्य ठेवून बससेवेची गुणवत्ता वाढीसाठी कठोर पावले उचलली आहेत. स्वमालकीच्या बस मार्गावर बंद पडल्यास संबंधित चालक आणि आगार अभियंता यांच्या अर्ध्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. याबाबत पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी आदेश काढलेआहेत.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. यातून दररोज 10 लाखांपेक्षा जास्त नागरिक पीएमपीतून प्रवास करतात. मात्र, बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रवाशांना वेळेचा अपव्यय, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते.रस्त्यावरच बस बंद पडल्याने प्रवाशांना अनेकदा पावसात उभे राहावे लागते, तर काही वेळा पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची कसरत ( PMPML) करावी लागते.
सद्यःस्थितीत पीएमपीच्या स्वमालकीच्या 737 बसची विविध आगारांत देखभाल, दुरुस्ती करण्यात येत आहे. यासह इतर बस संचलनास पाठविण्यापूर्वी आगार अभियंता यांनी तांत्रिक तपासणी व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करूनच बस रस्त्यावर सोडावी. तसेच, चालकांनी स्वतः बसची स्थिती तपासून मार्गावर कोणताही बिघाड होणार नाही, याची खात्री करावी, असे आदेशात म्हटले ( PMPML) आहे.