PMPML भाडेवाढीवर (PMPML Fare Hike) प्रवाशांची तीव्र प्रतिक्रिया
Team MyPuneCity – पीएमपीएमएलने अलीकडेच दररोजच्या बससेवेसाठी डेपो निहाय सुधारित स्टेज रचनेनुसार तिकिट दर व पास दर लागू केल्यामुळे (PMPML Fare Hike) प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. यापूर्वी एकसंध दररचना असताना, आता प्रत्येक डेपो निहाय वेगवेगळी दरपत्रके तयार करण्यात आली असून, ठराविक अंतरासाठी वेगवेगळ्या मार्गांवर वेगवेगळे भाडे आकारले जात आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना गोंधळाचा व अन्यायकारक दरवाढीचा अनुभव येत आहे.
५ रुपयांचे तिकीट गायब – थेट १० रुपयांपासून सुरुवात
नवीन दररचनेनुसार किमान तिकीट हे थेट १० रुपये झाले असून, पूर्वीचे ५ रुपयांचे तिकीट जवळपास पूर्णपणे बंद झाले आहे. यामुळे लहान अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेक प्रवासी संघटनांचा ठाम आग्रह आहे की, पूर्वीप्रमाणे किमान ५ रुपयांचे तिकीट पुन्हा सुरू करावे.
शंभर टक्क्यांपर्यंत दरवाढ – प्रवाशांचा विरोध
नवीन दररचनेत (PMPML Fare Hike) पूर्वीचे ३० रुपयांचे तिकीट थेट ५० रुपयांवर पोहोचले आहे. ही वाढ थेट ६५ टक्क्यांहून अधिक आहे. ही दरवाढ ५ ते १० टक्के इतकी मर्यादित असती, तर ती योग्य वाटली असती, अशी प्रवाशांची भावना आहे. दरनिश्चिती करताना एकच समान सूत्र असावे आणि सर्व मार्गांवर तेच दर लागू व्हावेत, अशी मागणी होत आहे.
Madhuri Misal : आळंदी परिसरात कत्तलखाना होणार नाही; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची ग्वाही
महापालिकेच्या अनुदानाचा लाभ प्रवाशांना मिळाला पाहिजे
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून पीएमपीएमएलला कोट्यवधींचे अनुदान दरवर्षी दिले जाते. हा निधी करदात्या नागरिकांचाच असल्याने, त्याचा थेट लाभ परवडणाऱ्या सेवा स्वरूपात प्रवाशांना मिळायला हवा. परंतु वाढीव भाड्यामुळे नागरिकांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. महापालिकेचे हे अनुदान फक्त संस्थेच्या तोट्यापुरते न वापरता, प्रवाशांच्या हितासाठी वापरणे आवश्यक आहे, अशी प्रवाशांची भावना आहे.
१ जूनच्या नव्या दरानंतर उत्पन्न वाढले, पण धोका कायम
पीएमपीएमएलच्या अधिकृत प्रेसनोटनुसार, रविवार, दिनांक १ जून २०२५ रोजी नव्या दरांची अंमलबजावणी (PMPML Fare Hike) झाली. त्यानंतरच्या पहिल्याच दिवशी, एकूण उत्पन्न १ कोटी ९७ लाख १७ हजार ४३० रुपये झाले आणि प्रवासी संख्या ९ लाख ४५ हजार ९७१ इतकी नोंदवण्यात आली. हे उत्पन्न मागील महिन्याच्या सरासरी उत्पन्नापेक्षा सुमारे ३९ टक्क्यांनी अधिक आहे. तथापि, हा पहिलाच दिवस असल्यामुळे दरवाढीबाबत बहुतांश प्रवाशांना कल्पना नव्हती. त्यामुळे प्रवासी संख्येवर त्या दिवशी मोठा परिणाम झाला नाही. पण आगामी काळात प्रवासी संख्या लक्षणीय घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, ज्यामुळे पीएमपीएमएलच्या उत्पन्नावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होण्याचा धोका आहे.
राजकीय पक्षांपुढे दरवाढीचे आव्हान
दरवाढीचा परिणाम (PMPML Fare Hike) केवळ प्रवाशांपुरता मर्यादित नसून, याचे राजकीय पडसाद लवकरच उमटण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना, प्रवाशांच्या खिशावर ताण देणाऱ्या या दरवाढीचा मुद्दा प्रचारात ऐरणीवर येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधारी पक्षालाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
अर्जुन मेदनकर यांची प्रतिक्रिया
या संदर्भात आळंदीतील पत्रकार आणि जागरूक नागरिक अर्जुन मेदनकर यांनी स्पष्टपणे सांगितले, “महापालिकेचे अनुदान घेणाऱ्या पीएमपीएमएलने सामान्य प्रवाशांचा विचार न करता थेट शंभर टक्के भाडेवाढ केली आहे. दरनिश्चितीसाठी एक समान सूत्र असावे, जे सर्व डेपोवर लागू होईल. तसेच किमान ५ रुपयांचे तिकीट पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे.”
प्रशासनाने दरवाढीचा फेरविचार करावा – प्रवाशांची मागणी
उच्च दरामुळे प्रवास करणे आर्थिक दृष्टिकोनातून अवघड झाले असून, यामुळे अनेक प्रवाशांनी बससेवा वापरणे कमी केले आहे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने दरवाढीचा (PMPML Fare Hike) फेरविचार करावा व पूर्वीच्या दरावर ५ टक्क्यांपर्यंत मर्यादित वाढ करून पुन्हा दरपत्रक जाहीर करावे, अशी सर्वसामान्य प्रवाशांची मागणी आहे.