Team My Pune City – आगामी महापालिका निवडणुकीसाठी(PMC) जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत तब्बल 380 हरकती आणि सूचना नागरिकांकडून दाखल करण्यात आल्या आहेत. या मध्ये प्रभागाच्या नावांमध्ये बदल करण्याची मागणी, सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप, नाले, ओढे व नदी ओलांडून करण्यात आलेल्या विभागणीवर नाराजी अशा प्रकारच्या मुद्द्यांवर हरकती मांडल्या आहेत.
शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालये तसेच सावरकर भवन येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात या हरकती जमा झाल्या आहेत. नागरिकांना 4 सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे महापालिका प्रशासनाने 22 ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केली होती. त्यानंतर नागरिकांकडून आठ दिवसांत 380 हरकती प्राप्त झाल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.
2017 मधील महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या (PMC)प्रभागरचनेवर अडीच हजारांहून अधिक हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्याच्या तुलनेत यंदा आलेल्या हरकतींची संख्या अद्याप मर्यादित असली, तरीही काही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सामूहिक हरकती नोंदवल्या आहेत. विशेषतः खराडी येथील थिटे वस्तीतील तब्बल 130 नागरिकांनी एकसारखी हरकत दाखल केली आहे. तसेच सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभागांबाबतही मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदविले गेले आहेत.
“महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती दाखल झाल्या आहेत. मात्र राजकीय पक्षांकडून अद्याप हरकती दाखल झालेल्या नाहीत,” अशी माहिती उपायुक्त प्रसाद काटकर यांनी (PMC) दिली.