Team My Pune City – पुणे महापालिकेच्यावतीने ( PMC ) शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ३ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पथ विभाग आणि १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने १५ टीम्स तयार करण्यात आल्या असून, महिनाभरात सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांत मेट्रो प्रकल्प, गृह विभागाच्या ( PMC ) कामांसह आपत्ती व्यवस्थापनासाठी फायबर केबल टाकण्याची खोदाई आणि पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. परिणामी रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, वाहतुकीचा वेग मंदावणे, कोंडी वाढणे आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.
आयुक्त राम यांनी सांगितले की, पावसाळा ( PMC ) संपल्याने रस्ते दुरुस्तीचे काम गतीमान करता येईल. तसेच जानेवारीत पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार असल्याने त्याआधीच शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत ठेकेदारांचे सहकार्य घेतले जाणार असून, महापालिकेचे प्रयत्न महिनाभरात सर्व रस्ते सुरक्षित आणि खड्डेमुक्त करण्याचे ( PMC ) राहतील.


















