Team MyPuneCity -बिस्किट कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने हिशोबात जाणीवपूर्वक चुका करून 15.50 लाखांची फसवणूक केली. ही घटना 4 जानेवारी ते 14 जून या कालावधीत गर्ग ट्रेडिंग कंपनी देहूगाव येथे घडली.
मनोज ओमप्रकाश अग्रवाल (45, देहुगाव) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार पिंटू शिवाजी अवघडी (देहुगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अग्रवाल यांची देहूगाव येथे बिस्कीट बनविण्याची गर्ग ट्रेडिंग कंपनी आहे. आरोपी पिंटू हा अग्रवाल यांच्या कंपनीमध्ये काम करतो. त्याच्या हिशोबात 43 हजारांची चूक लक्षात आल्याने अग्रवाल यांनी अधिकची चौकशी केली असता त्याने 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले.
भाड्याने नेलेली कार परत न देता फसवणूक
भाड्याने नेलेली कार परत देण्यास टाळाटाळ करून कार मालकाची फसवणूक करण्यात आली. ही घटना ८ जून रोजी रात्री बाणेर येथे घडली.
शुभम श्रीयम परशुराम सिंग (३०, बाणेर) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वरूप विश्वजित देव (वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune: संगीत क्षेत्रात आज करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वरूप याने फिर्यादी शुभम यांची साडेचार लाख रुपये किमतीची कार भाड्याने नेलेली. सात दिवस उलटून देखील त्याने कार परत केली नाही. कार परत मागितली असता कार देण्यासाठी टाळाटाळ केली.
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२.४० लाखांची फसवणूक
बर्गर किंग या दुकानाची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची १२.४० लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १९ मे ते ९ जून या कालावधीत चिखली येथे घडली.
अरुण शामलाल विजय (४९, मोशी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कपिल शर्मा, विनोद जैन, अरुण मैथ्यु व अनोळखी खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अरुण यांना मेल आणि कॉल करून संपर्क केला. त्यांना बर्गर किंग या दुकानाची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वेगवेगळी करणे सांगून अरुण यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपये घेत त्यांना फ्रेंचायजी न देता पैशांचा अपहार करून फसवणूक केली आहे.
गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक
भोसरी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या जळगाव येथील एका व्यक्तीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (१४ जून) सकाळी लांडेवाडी चौक, भोसरी येथे करण्यात आली.
देविदास शंकर सोनावणे (३०, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रणधीर माने यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली कि लांडेवाडी चौक, भोसरी येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयावरून देविदास याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार लाख ५२ हजार रुपये किमतीचा नऊ किलो ४० ग्रॅम गांजा आढळून आला.
उघड्या दरवाजावाटे चोरी
उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना नवी सांगवीतील आदर्शनगर भागात शनिवारी (१४ जून) पहाटे घडली.
सौरभ अरुण मेश्राम (२७, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ३.३० ते सकाळी ९.०० या दरम्यान, अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून ४० हजार रुपये किमतीचा सॅमसंग एस-२४ अल्ट्रा मोबाइल व १० हजार रुपये किमतीचा अॅपल एक्सआर मोबाइल असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी
स्पाईन रोडवरील चौकात एका दुचाकीस्वाराने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने महिला जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (१४ जून) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास स्पाइन रोड, भोसरी येथे घडली.
अरविंद कपीलदेव सिंग (४६, मांजरी बु.) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत जखमी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन समोरील चौकात फिर्यादी स्कूटीवरून पोलीस स्टेशनकडे वळत होत्या. त्यावेळी आरोपीने भरधाव व बेफिकीरपणे चालवलेली अव्हेंजर दुचाकीने (एमएच १२/एमएच ०६३४) फिर्यादीच्या स्कूटीला जोरात धडक दिली. यामध्ये त्यांच्या डाव्या पायाचे नडगीचे हाड फ्रॅक्चर झाले.
भोसरीत दारूच्या नशेत कार चालवून धडक
भरदिवसा दारूच्या नशेत वाहन चालवून कारला धडक देत शिवीगाळ आणि दमदाटी केली. ही घटना शुक्रवारी (१३ जून) पावणे बारा वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडली.
नीलेश पोपट कदम (भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत महादेव भोसले (३७, भोसरी. मूळ रा. सातारा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पावणे बारा वाजताच्या सुमारास, विश्व विलास हॉटेल समोर, भोसरी पुलाखाली, आरोपीने होन्डाई आय-१० कार (एमएच १२/एलडी ७७१५) ही भरधाव व दारूच्या नशेत चालवत फिर्यादीच्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच १४/एलएक्स १७६५) ला पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातानंतर “तुला काय करायचं ते कर” असे म्हणत आरोपीने शिवीगाळ केली.