Team MyPuneCity : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. पवना धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पवना नदी व नाले दुथडी भरून वाहू (Pimpri Flood) लागले आहेत. त्यामुळे सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शाळा, MHADA इमारती व सार्वजनिक ठिकाणे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
स्थलांतरित भाग व नागरिकांची संख्या (Pimpri Flood)
- संजय गांधी नगर, पिंपरी : पाणी घरात शिरल्याने अंदाजे ७५ रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ३० नागरिकांना कमला नेहरू शाळेत ठेवण्यात आले, तर इतर नातेवाईकांकडे गेले.
- पिंपळे निलख, पंचशील नगर: २५ नागरिकांना मनपा शाळेत सुरक्षित ठेवले.
- पिंपळे गुरव, लक्ष्मीनगर : तब्बल ४५ जणांना मनपा शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
- रामनगर, बोपखेल : ४० नागरिकांना मनपा शाळेत हलवले.
- चिंचवडगाव (सुरेश भोईर कार्यालयाजवळ): ४० नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू.
- वैभवनगर, पिंपरी : पंचशीलनगरातील ५ कुटुंबे (१४ जण) आणि लक्ष्मीनगरातील १२ कुटुंबे (३४ जण) शाळेत स्थलांतरित.
- किवळे परिसर: सुमारे ३०० बांधकाम मजुरांना MHADA इमारतीत हलवण्यात आले. उर्वरितांचे स्थलांतर सुरू आहे.
- भाट नगर : तब्बल १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाची तयारी
- QRT (Quick Response Team) F-झोनमध्ये सज्ज ठेवण्यात आली आहे. अद्याप या भागात स्थलांतराची गरज भासलेली नाही.
- टाउन हॉल परिसरात जेसीबी व मजुरांची तुकडी ठेवली असून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पुरवली जाणार आहे.
- महापालिकेच्या शाळा, सभागृह, MHADA इमारतींमध्ये विस्थापितांसाठी तात्पुरती निवासव्यवस्था, अन्न व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
Godumbre Rescue : नदीकाठी पाण्यात अडकलेल्या महिलेला वाचविण्यासाठी मध्यरात्री ‘रेस्क्यू ऑपरेशन’
प्रशासनाचा इशारा (Pimpri Flood)
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पवना नदीच्या पात्रातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांचा आक्रोश (Pimpri Flood)
स्थलांतरित झालेल्या एका महिलेने सांगितले,
“आम्ही रात्री उशिरापर्यंत घरात होतो, पण पाणी झपाट्याने आत घुसू लागल्याने घाईघाईने बाहेर पडावे लागले. महापालिकेने वेळेवर मदत केली, नाहीतर परिस्थिती बिकट झाली असती.”
एका कामगाराने सांगितले,
“किवळे भागात आम्ही सर्व मजूर एका बांधकाम प्रकल्पात राहत होतो. पाणी इतके वाढले की सगळे सामान सोडून निघावे लागले. आता आम्हाला MHADA इमारतीत ठेवण्यात आले आहे.”
पिंपरी-चिंचवड परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम असून, पुढील काही तास निर्णायक ठरणार आहेत. पाणीपातळी वाढल्यास आणखी नागरिकांना स्थलांतरित करण्याची शक्यता आहे. प्रशासनाने जनतेला अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीस अनुसरूनच कृती करण्याचे आवाहन केले आहे.