Team My Pune City – “गेल्या ३५ वर्षांपासून मठाची जशी एक अविभाज्य जाणीव बनलेली होती, तीच माधुरी हत्तीण आता मठातून अचानक गायब झाली आहे…” हे वाक्य उच्चारतानाही डोळे भरून येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी (महादेवी) हत्तीण गेल्या आठवड्यात गुपचूप गुजरातमधील अंबानींच्या वनतारा या खाजगी जंगलात हलवण्यात आली आणि त्यामुळे नांदणी गावासह कोल्हापूर, सांगली आणि आता पिंपरी चिंचवडपर्यंत लोकभावना उफाळून आली आहे.
७०० वर्षांची परंपरा असलेल्या नांदणी मठात हत्ती/हत्तीण असणे ही परंपरा आहे. माधुरी हत्तीण मागील ३५ वर्षांपासून मठाच्या सेवेत होती. ती लहानपणापासून मठातच वाढली, तिचा हरेक श्वास तिथल्याच वातावरणात मिसळलेला होता. अशा पवित्र परंपरेचा आणि जीवाचा भाग बनलेल्या हत्तीणीला देखभाल व्यवस्थित होत नाही, असे कारण देत, ‘पेटा’ सारख्या संस्थांचा आधार घेत जबरदस्तीने गुजरातला हलविण्यात आले. हे धनदांडग्यांच्या हट्टाखातर परंपरेशी खेळअसल्याचे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्येही संतापाची लाट
या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात आज सकाळी शेकडो श्रद्धावान नागरिक एकत्र जमले. अबालवृद्धांनी सभागृह भरून काढले. या वेळी श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट, वीर सेवा दल, महिला मंडळ, पाठशाळेचे विद्यार्थी यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
सभेमध्ये माधुरी हत्तीणीच्या जबरदस्तीच्या हलवणीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. *”ही फक्त एक हत्तीण नाही, तर एक परंपरा, एक संस्कृती होती… मठातील भक्तीचा जिवंत प्रतिक होती…” अशा भावना सर्वत्र व्यक्त होत होत्या. हत्तीण मठात परत यावी यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
उत्पादनांवर बहिष्काराची शपथ
या निषेधाच्या सभेत अंबानी यांच्या कंपन्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. नागरिकांनी जिओचे सीमकार्ड पोर्ट करण्याची तयारी दर्शवली. रिलायन्स मॉल, जिओमार्ट, जिओ फायबर, रिलायन्स पेट्रो आदींवर बहिष्कार टाकण्यात आला. “मूक प्राण्यांवर अन्याय करणाऱ्या धनिकांची उत्पादने आम्हाला नको…” अशी ठाम भूमिका घेण्यात आली.
मूक वेदना आणि सजीव आसवे
मठ सोडताना माधुरीच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू, तिची असहाय नजर आणि परिसरातील सन्नाटा… या वेदनेचा प्रत्यय घेतलेल्यांच्या डोळ्यांत आजही अश्रू आहेत. “ही फक्त एक हत्तीण नेण्याची गोष्ट नव्हे, तर एका संत परंपरेला तडा देण्याचा प्रयत्न आहे,” असे स्पष्टपणे या आंदोलनातून सांगितले गेले.
शासनाकडे आर्त विनंती
हत्तीण परत मिळावी, परंपरा अबाधित राहावी, या भावनेतून सर्व स्तरांतून शासनाला निवेदनं पाठवण्यात आली आहेत. “हत्तीण जाईल पण तिचा आशीर्वाद परत कसा येईल?” या प्रश्नाने संपूर्ण परिसर व्याकुळ झाला आहे.
“माधुरी परत मिळो, तिच्या डोळ्यांतली आसवेदेखील परत हसोत,” अशी हळवी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.