Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड शहरातील ( Pimpri-Chinchwad Police) ज्येष्ठ नागरिक आणि वाहतूक व्यवस्थेसाठी दोन महत्त्वपूर्ण आणि अत्याधुनिक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. बुधवार (१८ जून) रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ नावाचे मोबाईल ॲप आणि वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी ‘ट्रॅफिक बडी व्हॉट्सॲप’ प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.
‘ज्येष्ठानुबंध’: एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेले आदर, प्रेम आणि सुरक्षिततेचे वचन
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी ‘ज्येष्ठानुबंध’ हे विशेष ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या अंमलबजावणीसाठी कुशल व प्रशिक्षित अंमलदारांचा एक स्वतंत्र विभाग (कक्षा) तयार करण्यात आला असून, हे ॲप २४ तास कार्यरत राहणार आहे. आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल २० हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या ॲपमध्ये नोंदणी केली आहे, जे या उपक्रमाच्या ( Pimpri-Chinchwad Police)आवश्यकतेवर प्रकाश टाकते.
Maruti Chitampalli : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन
केवळ ॲप नाही, तर ऋणानुबंध!
हे केवळ एक ॲप नसून, ते ज्येष्ठ नागरिकांशी जोडलेले ‘ऋणानुबंध’ आहेत, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नमूद केले. ज्येष्ठांना इतर कोणतीही मदत लागल्यास, जसे की एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांना औषधे, जवळच्या हॉस्पिटलची माहिती, ॲम्ब्युलन्स सेवा, तात्काळ संपर्क क्रमांकाची मदत आणि इतर आवश्यक माहिती किंवा मदत या सर्व बाबींमध्ये पोलिसांमार्फत तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जाईल.
या ॲपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सेवांचे विश्लेषण करून, या सेवा अधिक गुणात्मक पद्धतीने आणि वेळेवर देण्याचे काम या ॲपद्वारे केले जाईल. ‘ज्येष्ठानुबंध’ हे एक ॲप नसून, एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला आदर, प्रेम आणि सुरक्षिततेचे वचन आहे. मूल्य जपणाऱ्या समाजाची आधुनिक ओळख म्हणजेच ‘ज्येष्ठानुबंध’ ॲप आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
‘ट्रॅफिक बडी व्हॉट्सॲप’ प्रणाली
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि शिस्तबद्ध करण्यासाठी एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी यांच्या तांत्रिक सहकार्याने “ट्रॅफिक बडी व्हॉट्सॲप” प्रणाली नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये कोणतेही ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही. कोणीही नागरिक ८७८८६४९८८५ या मोबाईल नंबरवर आपल्या मोबाईलमधून व्हॉट्सॲप संदेश पाठवून संवाद सुरू करू शकतो.
या प्रणालीमध्ये नागरिक मराठी किंवा इंग्रजी या दोन भाषांपैकी एका भाषेची निवड करून आपले नाव टाकून मुख्य मेनूमध्ये प्रवेश करू शकतात. यात वाहतुकीच्या समस्यांबाबत आठ पर्याय उपलब्ध आहेत, जसे की:
- वाहतुकीचे उल्लंघन
- वाहतूक कोंडी
- रस्त्यांची दुरवस्था
- इतर अडचणी (उदा. सिग्नल बंद असणे)
- अवैध पार्किंग
- सिग्नल विषयक अडचणी
- आणि इतर उपाय योजना ‘ट्रॅफिक बडी’ मधून जोडणे
तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडल्यानंतर, संबंधित फोटो काढून जीपीएस लोकेशनद्वारे जिओ टॅगिंग करून संबंधित वाहतूक विभागास तो संदेश प्राप्त होईल. याबाबतची पोचपावती आणि संदर्भ क्रमांक आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल. प्राप्त संदेशावर संबंधित वाहतूक विभाग किंवा मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण कक्ष योग्य कार्यवाही करून याबाबतचा पूर्तता संदेश ( Pimpri-Chinchwad Police) तुम्हाला पाठवेल.
Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य
नागरिक बनणार ‘ट्रॅफिक बडी’
वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवणे, अपघातग्रस्तांना मदत करणे यांसारख्या कामांमध्ये मदत करणाऱ्या स्वयंसेवी नागरिकांना ‘ट्रॅफिक बडी’ म्हणून या ॲपमध्ये जोडून घेण्याची अभिनव सुविधा उपलब्ध आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची कार्यक्षमता, कर्तव्यतत्परता आणि विश्वासार्हता वाढीस लागणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून संग्रहित माहितीचे विश्लेषण करून वाहतूक नियोजनासाठी आगाऊ उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
जसजशी जनतेचा सहभाग वाढेल आणि या ॲप्लिकेशनचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढेल, तसतशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील वाढेल. पर्यायाने लोकांमध्ये स्वयं-शिस्त वाढेल आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त ( Pimpri-Chinchwad Police) करण्यात आला.