Team MyPuneCity –अमली पदार्थ सेवन, विक्री, वितरण, गैरवापर, वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. अशा संबंधितांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र त्याचा वापर होऊ नये, अमली पदार्थ मुक्त शहर बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. २६ जून रोजी पार पडलेल्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच पथनाट्य, प्रभात फेरी, व्याख्यान यातून देखील जनजागृती करण्यात आली आहे.
अमली पदार्थांच्या विक्री, सेवन, वापर, वाहतूक याबाबत कारवाईसाठी केंद्र सरकारने मानस हेल्पलाईन क्रमांक १९३३ उपलब्ध करून दिला आहे. यावर नागरिकांनी तक्रार केल्यास संबंधित यंत्रणांकडून कारवाई केली जात असल्याचे सांगत अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सहायक निरीक्षक सचिन कदम यांनी अमली पदार्थ विरोधी कायद्याबाबत पिंपरी येथील कार्यक्रमात मार्गदर्शन केले. औंध हॉस्पिटलच्या जिल्हा सल्लागार डॉ. जयश्री सारस्वत यांनी व्यसनांचे मानवी जीवनावर होणारे विनाशकारी दुष्परिणाम आणि शासनाच्या विविध व्यसनमुक्ती योजनांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक हर्षल पंडित यांनी युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेची कारणे, त्याचे गंभीर परिणाम आणि उपलब्ध उपचार पद्धतींवर प्रकाश टाकला. पिंपरी येथील विमल फाउंडेशनचे व्यवस्थापक विल्यम साळवी यांनी व्यसनांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीनंतरच्या पुनर्वसनाचे महत्त्व समजावून सांगितले.



पथनाट्यातून जनजागृती
कार्यक्रमानंतर स्माईल व्यसनमुक्ती केंद्र आणि डिवाईन फाउंडेशनच्या कलाकारांनी अनुक्रमे ‘व्यसनांचे दुष्परिणाम’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान’ यावर आधारित प्रभावी पथनाट्ये सादर केली. या कार्यक्रमानंतर नेहरूनगर पिंपरी परिसरातील मासुळकर कॉलनी ते फुलेनगर झोपडपट्टी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली. विशेषतः, फुलेनगर पिंपरी झोपडपट्टीमध्ये पथनाट्यांद्वारे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करत जनजागृती करण्यात आली. यात राजश्री शाहू महाराज विद्यालय (चिखली), डी. वाय. पाटील कॉलेज (शाहूनगर), भोसरी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, देहूरोड नरसिंह हायस्कूल, सांगवी येथील भारतीय विद्यानिकेत विद्यालय, डी. वाय. पाटील कॉलेज (रावेत), गणेश इंग्लिश मीडियम स्कूल (दापोडी), प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल (भोसरी), भैरवनाथ महाविद्यालय (भोसरी), हाय व्हिजन कॉलेज व इंद्रायणी कॉलेज (तळेगाव दाभाडे), ज्ञानेश्वर विद्यालय (आळंदी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (धामणे, शिरगाव), पं. दीनदयाळ माध्यमिक विद्यालय व एच.ए. हायस्कूल (संत तुकाराम नगर), सूर्यदत्ता कॉलेज व रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (बावधन), एस.एन.बी.पी. स्कूल (काळेवाडी), भालचंद्र हायस्कूल, भैरवनाथ विद्यालय व लर्निंग ट्री स्कूल (म्हाळुंगे), डी. वाय. पाटील कॉलेज, माता रमाबाई आंबेडकर शाळा (निगडी), जयहिंद विद्यालय (पिंपरी) आणि भैरवनाथ विद्या मंदिर (तळेगाव एम.आय.डी.सी.) या संस्थांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे शरीर, मन आणि कुटुंबावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबद्दल माहिती देऊन त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले.