Team My Pune City – महिलेने लग्नासाठी नकार दिल्याने मित्राने महिलेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (२५ जुलै) रात्री १० वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली.
या प्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेशसिंग शिवकुमार (मनिंदरगड, कोरिया, छत्तीसगड) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मित्र आरोपी शिवकुमार याला लग्नाला नकार दिला होता. त्या कारणावरून त्याने फिर्यादीच्या घरी येऊन ‘तू माझ्याशी लग्न करत नाहीयेस! आत्ताच तुला जीवे मारतो!’ असे बोलून, फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर त्यांना उचलून दुसऱ्या मजल्याच्या पॅसेजवरून जीवे मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या मांडीचे हाड, बरगडी आणि पाठीचा मणका फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण करून लुटले
जुन्या भांडणाच्या रागातून एका व्यक्तीने कोयत्याने धाक दाखवून २५ हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवार (२५ जुलै) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चिखली येथील बारामती ॲग्रो चिकन सेंटर समोर टॉवरलाईन येथे घडली.
या प्रकरणी धनंजय धोंडिबा मावळे (३०, म्हेत्रे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल दत्ता कुदळे (२३, निगडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र स्वप्नील वंजारी बाहेरून फिरून आल्यानंतर टॉवर लाईन येथे त्यांची गाडी पार्किंग करत असताना आरोपी तिथे आला. त्याने आदल्या दिवशी म्हेत्रे गार्डन येथे झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या गाडीच्या मागच्या बाजूला मोठा दगड मारला, त्यामुळे गाडीची काच फुटली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला त्याच्याकडील कोयता दाखवून मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या गाडीतील डॅशबोर्डवर ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने घेतले. तेथे जमलेल्या लोकांना भीती दाखवत त्याने हातातील कोयता हवेत फिरवला आणि फिर्यादीच्या गाडीसमोर पार्क केलेल्या गाडीवर दगड मारून तिचीही काच फोडली. शेवटी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करून तो मोटरसायकलवरून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले आणि मारहाण करत असताना त्याने त्यांना धक्काबुक्की करून तिथून मोटरसायकलवर पळून गेला. चिखली पोलीस तपास करत आहेत.
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (२६ जुलै) सायंकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.
मोतीराम भैवरु रामदेवासी (४०, सावरदरी, खेड. मूळगाव राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद खैरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला आणि तंबाखूजन्य पदार्थ ग्राहकांना विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत मोतीराम याच्या ताब्यातून २० हजार ४५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
बेकायदेशीरपणे वाहने पार्क केल्या बाबत गुन्हा दाखल
Ajit Pawar: हिंजवडीच्या विकासकामात अडथळे आणणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा- अजित पवार यांचा स्पष्ट इशारा
Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; भक्ती सोपान पुलावरून पाणी
दोन वाहने डिव्हायडर शेजारी पार्क करून रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार (२६ जुलै) रोजी दुपारी पिंपरी येथील भोला हॉटेलसमोरील के.एस.बी. चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर घडली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल बडक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ रविंद्र भावसार (श्रीरामपूर, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील दोन वाहने (एमएच १२/सीके ६६०० आणि एमएच ०३/एआर ३०४९) भोला हॉटेलसमोरील के.एस.बी. चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर डिव्हायडर शेजारी पार्क करून रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना व वाहनांना अडथळा निर्माण केला. वाहने रस्त्यावरून काढण्याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल बडक यांनी सांगितले असता, त्याने पोलिसांशी अरेरावीची भाषा वापरून “मी गाड्या काढत नाही, तुम्हाला काय करायचे आहे ते करून घ्या, तुम्हाला काय अधिकार आहे गाड्या काढण्याचा” असे बोलून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
हद्दपारीचा आदेश मोडून सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (२६ जुलै) सायंकाळी निगडी येथील आयटीआय कॉलेजजवळ करण्यात आली.
आदित्य उर्फ भाव्या किशोर बावीस्कर (२३, ओटास्किम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित सानप यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२३ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याने कुठलीही परवानगी न घेता तो शहरात आला. त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
चिखलीमध्ये जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
पत्त्याच्या पानावर फ्लॅश नावाचा जुगार खेळत असताना ५ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (२६ जुलै) दुपारी चिखली येथील कृष्णानगर चौकाजवळ करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाना मरिभाऊ मरगुंड (४९, चिखली), कुमार मारुती थोरात (३५, चिखली), शहाजी विठ्ठल वाघमारे (४८, चिखली), गणेश सोमनाथ आडसुळ (३६, चिखली) आणि भगवान यशवंत पवार (२८, चिखली) अशी अटक केलेल्या नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्याच्या पानावर फ्लॅश नावाचा जुगार पैसे लावून खेळत होते. या जुगार अड्ड्याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १६४० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
मुंबई बंगलोर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
मुंबई बंगलोर महामार्गावर पुनावळे येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२४ जुलै) रात्री घडली.
सतीश चंद्रशेखर निघोजकर (४३, तळेगाव दाभाडे, मावळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी उदय मधुसूदन देशमुख (४३, घोडबंदर रोड, मुंबई) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मेहुणे सतीश निघोजकर हे त्यांच्या गाडीवरून कामावरून घरी जात होते. पुनावळे येथे पवना नदी ब्रिजवर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सतीश यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहन चालक अपघाताची माहिती न देता निघून गेला. रावेत पोलीस तपास करत आहेत.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १.७ कोटींची फसवणूक
बनावट शेअर मार्केट ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगून १ कोटी ७ लाख ३७ हजार ८८५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेरॉन त्रिवेदी आणि मेहुल गोयल तसेच नऊ बँक खाते धारक व ऍप्लिकेशन धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना आरोपी शेरॉन याने एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्या ग्रुपवर एक लिंक पाठवून त्याद्वारे फिर्यादींना एक बनावट शेअर मार्केट ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. व्हॉट्स अप ग्रुपचे ॲडमिन आरोपी शेरॉन आणि मेहुल यांनी त्या ॲपद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगकरिता वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकूण ४ कोटी इतका आभासी परतावा आरोपींनी फिर्यादीला दाखवला. तसेच फिर्यादींना त्यांची रक्कम काढण्याकरिता वेगवेगळे सर्व्हिस चार्ज, सर्व्हिस टॅक्स भरण्यास सांगितले. यामध्ये आरोपींनी एकूण १ कोटी ७ लाख ३७ हजार ८८५ रुपये रक्कम भरण्यास भाग पाडून ते पैसे परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.