Team My pune city – बेदरकारपणे दुचाकी चालविल्याने मोटारसायकल स्लीप होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ( Pimpri Chinchwad Crime News 28 July 2025) त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार (२७ जुलै) रोजी सायंकाळी चांदणी चौकाजवळ, भुगाव रोड, बावधन, पुणे येथे घडली.
रिध्देश निलेश जाधव (१९, कोथरूड, पुणे; मूळ धुळे) याचा अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बंडू सांगळे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धेश हा दुचाकी (एमएच १५ केबी २५९९) वरून भूगाव रोडने जात होता. त्याने वाहतुकीचे नियम मोडून बेदरकारपणे, हयगयीने मोटारसायकल चालवली. त्यामुळे दुचाकी स्लीप होऊन पडली. यात मोटारसायकलचे नुकसान झाले आणि रिद्धेश याच्या छातीला, डोक्याला, पोटाला, हात-पायांना गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करत आहेत.
आळंदीमध्ये ट्रेलरच्या धडकेने एकाचा मृत्यू, एक जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 28 July 2025)
मरकळ गावाच्या हद्दीत, मरकळ ते आळंदी जाणाऱ्या रोडवर ट्रेलरच्या धडकेने एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि १२ वर्षीय मुलगा जखमी झाला. ही घटना रविवार (२७ जुलै) रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवम निलेश काबरा (१७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आराध्य निलेश काबरा (१२) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी महेश जयनारायण काबरा (५१, मरकळ, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवराज बाबासाहेब नाकाडे (२५, गहिनीनाथ नगर, महाकाळा, अंबड, जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेलर (एमएच १४ एलबी ७६७७) चालकाने आपला ट्रेलर भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवला आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, वाहतुकीचे नियम मोडून, होडा ॲक्टिव्हा (एमएच १२ क्युयु ५५०६) वरून तुळापूर बाजूकडून येणाऱ्या फिर्यादीचे नातेवाईक शिवम निलेश काबरा याच्या गाडीस धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि आराध्य निलेश काबरा हा जखमी झाला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा ( Pimpri Chinchwad Crime News 28 July 2025)
एका व्यक्तीने दारू पिऊन वाहन चालवून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड केली व वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै) दुपारी पी.एम.टी. चौक, पुणे-नाशिक हायवे, भोसरी येथे घडली.
विनय नवनाथ चौधरी (२९, देवकर वस्ती, कॉलनी नंबर १, गणराज मित्र मंडळ जवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार दगडगावे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मद्यार्क सेवन करून नशेत धुंद अवस्थेत आपली मोटार कार (एम.एच १४ एम के ००९३) पी.एम.टी. चौक, भोसरी पोलीस चौकीच्या समोर, पुणे-नाशिक हायवे, भोसरी येथे चालवली. त्याने सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरड केली व वाहतुकीस अडथळा केला. तसेच फिर्यादी व फिर्यादीसोबतच्या अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 28 July 2025)
पिंपरी येथील हिंदुस्तान ॲन्टीबायोटिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (२७ जुलै) रात्री ८.४५ वाजता करण्यात आली.
नावेद खमर कुरेशी (२२, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष रजपुत यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात २०० रुपये किमतीची एक लोखंडी कुकरी हे हत्यार बेकायदेशीररित्या जवळ बाळगून असताना मिळून आला. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
Annabhau Sathe Award : “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार” डॉ. शेटीया माय – लेकीला जाहीर
दारू विक्री प्रकरणी तरुणाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 28 July 2025)
निगडी येथील सोमेश्वर मंदिराच्या बाजूला, मिलिंदनगर, ओटास्किम येथे पत्राशेड लगत मोकळ्या जागेत ७३ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई रविवारी (२७ जुलै) सकाळी मिलिंदनगर, ओटास्किम, निगडी येथे करण्यात आली.
किरण चंद्रकांत कुलाले (२८, मिलिंदनगर, ओटास्किम, निगडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक तांदळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काळ्या रंगाच्या ३५ लिटर क्षमतेच्या एका प्लास्टिक कॅनमधून आणि १० लिटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाच्या चार प्लास्टिक कॅनमधून एकूण अंदाजे ७३ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू १०० रुपये प्रति लिटरप्रमाणे विक्रीसाठी बाळगलेली होती. त्या दारूची किंमत सात हजार ३०० रुपये होती. पोलिसांनी कारवाई करत दारू जप्त करत किरण याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.
बावधन येथे १ लाख ९१ हजार रुपयांचे मेफेड्रॉन जप्त ( Pimpri Chinchwad Crime News 28 July 2025)
बावधन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाषाण सुस सर्विस रोड, मोहनगर येथे एका व्यक्तीच्या ताब्यातून १ लाख ९१ हजार ७०० रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (२७ जुलै) रात्री करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुमित देवकर यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राकेश झुबामराम चौधरी (२६, इंदीरानगर, बिबवेवाडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यातून एकूण १९.१७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, ज्याची किंमत १,९१,७०० रुपये आहे, तसेच १०,००० रुपये किमतीचा एक मोबाईल आणि ५०० रुपये किमतीचा एक वजन काटा असा एकूण २,०१,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.