Team My pune city – निगडी प्राधिकरणातील एका व्यक्तीच्या घराजवळ जातीवाचक शिवीगाळ करत, जीवे ठार मारण्याची धमकी( Pimpri Chinchwad Crime News 24 July 2025) देत, घराचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (२१ जुलै) मध्यरात्री घडली.
या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश दत्तात्रय ढवळे (२८, तळवडे पुणे) आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश ढवळे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचे भाऊ अनिल यांच्या घरी असताना आरोपी आणि त्याचा अनोळखी साथीदार फिर्यादीच्या भावाच्या घराच्या गेटवर चढून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. मी मोकातून बाहेर आलो आहे. मी इथला भाई आहे, असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनीसिमेंटचे ब्लॉक्स फिर्यादीच्या दिशेने फेकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरोपीच्या अनोळखी साथीदाराने त्याच्या हातातील कोयत्याने घराच्या गेटला लावलेला बोर्ड आणि वॉलकंपाऊंडवर लावलेले लॅम्प तोडून नुकसान केले. आरोपीने घराच्या गेटवर लघुशंका देखील केली.
PMPML : पीएमपीएमएलची पुणे लोणावळा मार्गावर पर्यटन बस सेवा
ॲपद्वारे ५७ लाखांची आर्थिक फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 24 July 2025)
ॲप आणि व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ५७ लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १७ मार्च ते २२ मे या कालावधीत ऑनलाईन घडली.
या प्रकरणी टी चिंटु सुबुधी (३७, पिंपरी) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवी कुमार शर्मा, अबॉट वेल्थ ॲप, व्हॉटसॲप क्रमांक धारक आणि विविध बँक अकाऊंट धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (३३, एरंडवणा पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप ग्रुपवर गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने गुंतवलेले पैसे काढण्यासाठी वेगवेगळे चार्जेस भरण्यास भाग पाडले. त्यांना अबॉट वेल्थ ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून आणि वेगवेगळ्या ब्रोकर्स बँक अकाऊंटवर एकूण ५७ लाख ७० हजार ६७० रुपये गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
बांधकाम साईटवर पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 24 July 2025)
चाकण येथे एका बांधकाम साईटवर पाचव्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (२२ जुलै) राणुबाई मळा, चाकण येथे घडली.
या बाबत सनत रामलाल यादव (३८, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळु बाजीराव वाणी (४७, आळंदी देवाची) आणि सिताराम अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळु वाणी याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ पाचव्या मजल्यावर प्लास्टरसाठी बांधण्यात आलेले बांबूचे पहाड सोडत असताना तो खाली पडला. बांधकामाच्या ठिकाणी फिर्यादीच्या भावाला कोणत्याही प्रकारची बांधकाम सुरक्षा किंवा सुरक्षेशी संबंधित उपाययोजना पुरवली नव्हती, ज्यामुळे त्याचा पडून मृत्यू झाला. बिल्डींगचा ठेकेदार आरोपी बाळू वाणी याने कोणतीही बांधकाम सुरक्षा आणि सुरक्षेशी संबंधित उपाययोजना न पुरविल्याने ही घटना घडली.
Suicide attempt : इंद्रायणी नदीमध्ये युवकाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात अग्निशमन दलास यश
भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 24 July 2025)
मोशी येथे पुणे नाशिक हायवेवर भरधाव वेगाने आलेल्या बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२३ जुलै) घडली.
बबलू नंदजी गुप्ता (३७) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी सुरेश राजमी कदम (४३, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बस (एमएच १४/ जीडी ४४६०) चालक आसाराम विठ्ठल बहीर (५८, आळंदी देवाची) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक हायवेवर बनकरवस्ती, मोशी येथे बस चालकाने बस वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने चालवली. त्याने बसचा धक्का दुचाकीला (एमएच १४/डीएस ०२३६) दिला. त्यामुळे मोटार सायकल रस्त्यावर खाली पडली आणि चालक बबलू गुप्ता याच्या डोक्यावरून बसचे मागील चाक गेल्याने तो गंभीर जखमी होऊन मयत झाला. या अपघातामध्ये सुरेश कदम यांच्या खांद्याला, उजव्या पायाच्या अंगठ्याला आणि गुडघ्याला जखम झाली असून मोटार सायकलचे नुकसान झाले आहे.
गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 24 July 2025)
महाळुंगे एमआयडीसीमध्ये गांजा बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (२३ जुलै) सायंकाळी येलवाडी येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद खैरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संकठाप्रसाद राजेशकुमार पाण्डेय (२२, येलवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येलवाडी येथे एका हॉटेल जवळ एकजण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संकठाप्रसाद याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात ४३ हजार २०० रुपये किमतीचा प्लॅस्टिक पिशवीमध्ये असलेला ८६४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 24 July 2025)
बेकायदेशीरपणे पिस्टल बगळल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२३ जुलै) रात्री थेरगाव येथे करण्यात आली.
साहिल जाफर शेख (२२, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह शुभम नावळे (जुनी सांगवी) आणि तेजस निकम (नवी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश गिरीगोसावी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाने थेरगाव येथून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याने हे पिस्टल शुभम नावळे आणि तेजस निकम यांच्याकडून आणल्याने त्या दोघांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला.