Team My Pune City –मैत्रीणीला मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून (Pimpri Chinchwad Crime News 20 July 2025)एका तरुणावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यात तरुणाच्या डाव्या हाताला आठ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (१८ जुलै) सायंकाळी खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीतील अँटोलिन लाइटिंग या कंपनीत घडली.
या प्रकरणी शरद जगन्नाथ लूचारे (४९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश वसंत हिवाळे (२४) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश हिवाळे याने फिर्यादी शरद लूचारे यांना ‘तू रागिणीला का मेसेज केलास’ असे विचारले. यावरून त्यांच्या तोंडावर चापट मारत ‘तुला जीवे मारतो’ अशी धमकी दिली. आरोपीने कमरेत लपवून ठेवलेला चाकू काढून शरद यांच्या डाव्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शरद हे बाजूला सरकल्याने चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाला लागला आणि त्यात त्यांना आठ टाके पडले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Nigdi: संत निरंकारी मिशनतर्फे रुपीनगर, निगडीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर; ६०० नागरिकांना लाभ
Maval Crime News :शेतात काम करत असताना भावाला मारहाण
कंपनीतून काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याकडून खंडणीची मागणी
कंपनी प्रशासनाने कामावरून कमी केल्याच्या रागातून एका माजी कर्मचाऱ्याने आपल्याच जुन्या सहकाऱ्याकडे खंडणीची मागणी करत धमकी दिल्याचे उघड झाले आहे. आरोपीने पैशांची मागणी करत त्रास दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ ते २७ जून २०२५ दरम्यान मौजे आंबेठाण येथील टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीत घडली.
या प्रकरणी कुलदिप सिंग हरक्रीशन सिंग (४६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रल्हाद शांताराम बच्चे (३०, पाइट, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलदिप सिंग हे टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीत कामावर येत असताना, पूर्वी याच कंपनीत काम करणाऱ्या आरोपी प्रल्हाद बच्चे याने त्यांचा पाठलाग केला. कंपनीने आपल्याविरोधात मिळालेल्या तक्रारींमुळे कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून, आरोपीने कुलदिप सिंग यांना धमकावले. ‘तू मला कामावरून काढून टाकले आहे, आता तू पगाराएवढे पैसे दर महिन्याला द्यायचे, नाहीतर तुलाही काम करू देणार नाही आणि तुझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करीन’ अशी धमकी देत पैशांची मागणी केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
टाटा मोटर्स कंपनीत युनियन प्रतिनिधीकडून कर्मचाऱ्याला मारहाण
टाटा मोटर्स कंपनीच्या युनियन कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान एका कर्मचाऱ्यावर युनियन प्रतिनिधींनी मारहाण करून अंगावर कचरा फेकल्याची घटना उघडकीस आली. यात कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी (१८ जुलै) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टाटा मोटर्स कंपनीच्या एचआर ऑफिस शेजारील युनियन ऑफिसमध्ये घडली.
या प्रकरणी विनोद विठ्ठल खुरंगळे (४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र पाटील, विक्रम वर्षे, चेतन बालवाडकर आणि रितेश पिसाळ या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी टाटा मोटर्समध्ये नोकरी करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स कंपनीच्या युनियन ऑफिसमध्ये युनियन प्रतिनिधींची बैठक सुरू असताना, बैठकीतील आरोपींपैकी एकाने ‘युनियनमध्ये खूप कचरा झाला आहे, तो साफ केला पाहिजे’ असे म्हटले. त्यानंतर बाहेरची कचऱ्याने भरलेली डस्टबिन आणून विनोद खुरंगळे यांच्या अंगावर टाकली आणि त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, इतर दोन आरोपींनी विनोद यांना हाताने मारहाण केली आणि एकाने पाण्याची स्टीलची बॉटल डोक्याच्या उजव्या बाजूला मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना शनिवारी (१९ जुलै) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास काळे कॉलनी, दिघी येथे घडली.
शीतल रोहन दगडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रोहन विष्णु दगडे (३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहन रामकिसन पासवान (२७, लोणीकंद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन दगडे आणि त्यांची पत्नी शीतल हे त्यांच्या ज्युपिटर गाडीवरून जात असताना, हायवा ट्रक (एमएच १२/डब्लूएक्स ७७२१) चालकाने आपला ट्रक भरधाव वेगाने, हयगयीने आणि धोकादायक पद्धतीने चालवला. ट्रकने दगडे यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रोहन यांच्या पत्नी शीतल यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.
अज्ञात टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
अज्ञात टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला, ओठाला, डाव्या हाताला आणि डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (१९ जुलै) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नढे कॉर्नर, विजयनगर बस स्टॉपजवळ, काळेवाडी येथे घडली.
या प्रकरणी नागेश गणेश डोके (३६) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात टेम्पोवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश डोके हे त्यांची मोटारसायकल (एमएच १४/एमजे ६१६९) वरून काळेवाडी फाट्यावरून त्यांच्या राहत्या घराकडे जात होते. त्यावेळी नढे कॉर्नर, विजयनगर बस स्टॉपजवळ, काळेवाडी येथे एका अज्ञात टेम्पोने त्यांना पाठीमागून येऊन धडक दिली. या धडकेमुळे नागेश यांच्या डोक्याला, ओठाला, डाव्या हाताला आणि डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.