Team MyPuneCity – ऑनलाइन माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत ३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक (Pimpri Chinchwad Crime News 18 May 2025)केल्याचा प्रकार समोर आला आहे.
श्रद्धा चोप्रा व सुरेंद्रकुमार दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याशी व्हॉटसअॅपद्वारे संपर्क केला. शेअर बाजारातील आयपीओ खरेदी केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ३ लाख ३० हजार रुपये भरण्यास लावून पैसे परत न देता फसवणूक केली. पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे तपास करीत आहेत.
ओव्हरटेक केल्याचा जाब विचारल्याने कार चालकाला चौघांची मारहाण (Pimpri Chinchwad Crime News 18 May 2025)
कारमधून चाललेल्या एका तरुणावर चार जणांनी शस्त्राने मारहाण केली. ही घटना दि. १५ मे रोजी सायंकाळी पिंपळे निलख येथील भारत पेट्रोल पंपासमोर घडली.
उदित राजेंद्रकुमार गोस्वामी (वय ३०, रा. लोटस लिली अपार्टमेंट, पिंपळे निलख, मुळ – जबलपूर, मध्यप्रदेश) असे जखमीचे नाव असून त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन दुचाकीवरील चार हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गोस्वामी हे आपल्या फिएस्टा कारमधून चालले होते. त्यावेळी अॅक्टिव्हावरील दोघांनी त्यांच्या गाडीला डाव्या बाजूने ओव्हरटेक केले. याबाबत विचारणा केल्यावर त्या दोघांनी फिर्यादीवर हल्ला चढवला व नंतर आणखी दोन साथीदारांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून फिर्यादीस हाताने व धारदार शस्त्राने मारहाण करत डोक्यात गंभीर दुखापत केली. पोलीस हवालदार सुतार तपास करीत आहेत.
Khed Crime News : सावकाराने जबरदस्तीने टेम्पो, दुचाकी घेतली ताब्यात; गुन्हा दाखल
गांजाची वाहतूक करणारा गजाआड (Pimpri Chinchwad Crime News 18 May 2025)
गांजा वाहतूक करणार्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी (दि. १६) चाकण परिसरात करण्यात आली.
कुमार बबन मोहीते (वय ३४, रा. सातकरस्थळ, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. साईसिंग पावरा (रा. शिरपूर, जि. धुळे) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस शिपाई निखिल वर्पे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे – नाशिक महामार्गावरील हॉटेल भाम किनारा जवळ आरोपी मोहिते याच्याकडून १५ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा, एक चारचाकी वाहन व एक मोबाईल असा एकूण १३ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत त्याने हा गांजा आरोपी पावरा याच्याकडून आणल्याचे कबूल केले. फौजदार बोरकर तपास करीत आहेत.