Team My Pune City -नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सोमवारी (१४ जुलै) दिघी येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पीडित पुरुषाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनंजय कारखानिस, नूतन कारखानिस, रोहित कारखानिस आणि तुषार कारखानिस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी फिर्यादीच्या सुरज जाधव या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वेळोवेळी चेक आणि रोख रक्कम स्वरूपात एकूण १३ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, मुलाला नोकरी न फसवणूक केली. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता, फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
टेम्पोतून गांजाची वाहतूक; दोघांना अटक
टेम्पोतून गांजाची तस्करी करत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (१४ जुलै) पहाटे सव्वादोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
श्रेयस प्रदीप चव्हाण (२१, हडपसर) आणि राम व्यंकट पितळे (२५, उरळी देवाची) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बाळू कोल्हेवाड याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार जावेद रफिक बागसिराज (३९) यांनी सोमवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे एका टेम्पो मधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संबंधित टेम्पो (एमएच १२ यूएम ११५५) अडवला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे आढळले. टेम्पो चालक आणि अन्य एक अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांच्या ताब्यातून टेम्पोसह एकूण एक कोटी ३५ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये २६४ किलो २२६ ग्रॅम गांजा, दोन मोबाइल, आधारकार्ड याचा समावेश आले. हा गांजा आरोपी कोल्हेवाड याने दिला असून तो कोणाला द्यायाचा याबाबत तो सांगणार होता. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
कारची रिक्षाला धडक; रिक्षाचालक जखमी
भरधाव वेगातील कारने रिक्षाला समोरून धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (१३ जुलै) दुपारी चाकण येथील आयएआय कंपनीजवळील सिग्नलजवळ घडली.
याप्रकरणी कार (एमएच १५ जेडब्ल्यू ४६४७) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ काशिनाथ डांगे (३६, चाकण) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी सोमवारी (१४ जुलै) याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास रिक्षाने जात असताना समोरून आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात डांगे यांच्या डोळ्याजवळ, छातीवर, हातावर व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१३ जुलै) रात्री वाकड फाटा बस स्टॉप जवळ वाकड येथे घडली.
प्रसाद महावीर म्हाकाळे (३५, थेरगाव) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल महावीर मारूती म्हाकाळे (६३) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा हा औधकडून जगताप डेअरीकडे दुचाकीने प्रवास करीत होता. तो वाकड फाटा बसस्टॉपच्या जवळ आला असताना त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला.
मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाला मारहाण
मोबाइल चोरीचा संशय घेऊन एका तरुणाला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना माण, म्हाळुंगे रोड येथील व्हीटीपी लेबर कॅम्पमध्ये रविवारी (१३ जुलै) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
अनिलकुमार उदल बिंद (२८, म्हाळुंगे रोड, मुळशी) आणि बबुल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी अनिलकुमार याला अटक केली आहे. श्रवण गजेंद्र साव (२१, म्हाळुंगे) असे जखमीचे नाव असून त्यांनी सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रवण यांनी मोबाइल घेतल्याच्या संशयावरून शिवीगाळ करत आरोपी अनिलकुमार याने डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच आरोपी बबुल याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी श्रवण हे गंभीर जखमी झाले आहेत.