दुकानमालक तरूणीसह भागिदार ताब्यात
Team My pune city – चर्होली येथील प्रोटीन सप्लीमेंटच्या ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 ) दुकानात आर्थिक वादातून दुकान मालक तरूणीसह तिच्या भागिदाराने एका तरुणाचा लोखंडी पहार आणि रॉडने मारहाण करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. १३) दुपारी घडली. याप्रकरणी आरोपी तरूणीसह तरूणाला दिघी पोलीसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे (वय ३६, रा. वडमुखवाडी, चर्होली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्रांजल तावरे (वय २२, रा. चर्होली) या तरूणीसह तिचा भागिदार यश पाटोळे (वय २५, रा. डुडुळगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – आळंदी रस्त्यावर चर्होली येथील काळे पेट्रोल पंपाजवळ आरोपी प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांचे भागिदारीत ‘प्रोटीन पझल’ नावाचे दुकान आहे. तर, यश पाटोळे हा चर्होली फाटा येथील एका जीममध्ये ट्रेनरही आहे. प्रांजल आणि गोपीनाथ यांची ओळख होती. बुधवारी (दि. १३) दुपारी गोपीनाथ हे दुकानात आले. आर्थिक देवाण-घेवाणीवरून त्यांच्यात वाद झाला. त्यांनी यश व प्रांजल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी यश आणि प्रांजल यांनी गोपीनाथ यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत गोपीनाथ गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रांजल आणि यश या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली खंडणीची मागणी करत मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
फ्रेशर्स पार्टीचा पोस्टर लावल्याच्या कारणावरून एका स्वयंघोषित भाईने तरुणाकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली आणि त्याच्यासोबत मारहाण केली. ही घटना बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी किवळे येथील सिम्बॉयसिस कॉलेजजवळील बुज कॅफे येथे घडली.
या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हुसेन डांगे, मिया खान, अमन शेख आणि एका अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीच्या जाहिरातीचा पोस्टर लावत होते. तेव्हा आरोपी हुसेन डांगे तिथे आला आणि त्याने पोस्टर फाडून “तुम्ही इथे फ्रेशर्स पार्टी घेऊ शकत नाही आणि जर घ्यायची असेल तर मला २५ हजार रुपये द्यावे लागतील, कारण मी इथला भाई आहे” अशी धमकी दिली. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी देऊन त्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली. हुसेन डांगे आणि मिया खान यांनी फिर्यादीच्या पोटात व डोक्यात ठोसे मारून जखमी केले. अमन शेख आणि अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला पकडून ठेवले असताना, हुसेन डांगेने फिर्यादीच्या खिशातून ३ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. रावेत पोलीस तपास करत आहेत.
Ganeshotsav : गणेशोत्सव काळात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश जारी
कंपनीच्या गोपनीय माहितीची चोरी, ८२ कोटींचे नुकसान ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल २०२४ पासून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हिंजवडी येथील फ्युचरिइम टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीत घडली.
बिश्वजीत मिश्रा (४५, बाणेर, पुणे), नयुम शेख (४२, कोंढवा, पुणे), सागर विष्णू (३९, रहाटणी, पुणे) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय प्रभाकर काळे (४५, थेरगाव, पुणे) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग केला. फिर्यादीच्या कंपनीतील गोपनीय आणि कॉपीराईट संरक्षित सोर्स कोड व सॉफ्टवेअर सोल्यूशनची चोरी केली. तसेच, १०० बेकायदेशीरपणे विकसित केलेल्या वेबसाइटचा मोबदला, अपॉर्च्युनिटी लॉस आणि इतर सेवांच्या माध्यमातून कंपनीचे अंदाजे ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. आरोपींनी नवीन कंपनी स्थापन करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या कंपनीतील सॉफ्टवेअर सोल्यूशन आणि सोर्स कोडचा वापर केला. सायबर पोलीस तपास करत आहेत.
ईमेल हॅक करून कंपनीची १.३९ कोटींची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
चाकण येथील ‘एनझेन बायोसायन्सेस लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अज्ञात व्यक्तीने ईमेल हॅक करून व्हेंडरची माहिती चोरली. बनावट बँक खात्याची माहिती पुरवून कंपनीची १ लाख ५९ हजार ६० अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे १.३९ कोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना २ एप्रिल ते १३ मे २०२५ दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती आणि बनावट बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने ‘एनझेन’ कंपनीतील कर्मचाऱ्याचा ईमेल आयडी हॅक करून, व्हेंडरची माहिती चोरली. त्याने बनावट बँक खात्याची माहिती ईमेलद्वारे पुरवली आणि इनबॉक्समधील तसेच डिलीट केलेल्या ईमेलची चोरी केली. या आधारावर, व्हेंडरशी साधर्म्य असलेल्या बनावट डोमेन आणि ईमेल आयडीचा वापर करून बँक खात्याची माहिती बदलली. जेव्हा कंपनीच्या अकाउंट पेएबल टीमने या बनावट खात्यावर पेमेंट सुरू केले, तेव्हा अज्ञात व्यक्तीने स्वतःसाठी रक्कम घेऊन कंपनीची १ लाख ५९ हजार ६० अमेरिकन डॉलर (भारतीय रुपयांमध्ये एक कोटी ३९ लाख रुपये)ची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.
कंपनीत मशीनचा पार्ट अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरवता आणि बिघाड असलेली मशिनरी सुरू ठेवल्याने मशीनचा पार्ट अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर दोन कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी आठ वाजता चाकण येथील ऑटो मॅक्स इंडिया प्रा. लि. कंपनीत घडली.
डुलशेलु दुसार (५६) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. श्रेयस हनुमंत भगत आणि राज निषाद अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्रकुमार डुलशेलु दुसार पासवान (२५, नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी योगेश सूर्यभान भुसारे (३०, आंबेठाण चौक, चाकण) याला अटक केली आहे. तसेच कॉन्ट्रॅक्टर प्रकाश ठाणगे याच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कॉन्ट्रॅक्टर प्रकाश ठाणगे यांने कामगारांना हेल्मेट किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने दिली नाहीत. तसेच सुपरवायझर योगेश भुसारे यांना ‘सेव्हन पावडर कोटींग’ मशिनमध्ये बिघाड असल्याची जाणीव असूनही, त्यांनी काम सुरू ठेवले. यामुळे काम सुरू असताना मशिनची ट्रॉली फिर्यादीचे वडील डुलशेलु यांच्या डोक्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत श्रेयस हनुमंत भगत आणि राज निषाद हे दोन कामगारही जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करत आहेत.
वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
जुन्या व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीने फिर्यादीच्या भावाशी वाद घातला आणि त्यानंतर वाद मिटवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
या प्रकरणी अमोल पांडुरंग शिंदे (२८, रावेत) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास प्रल्हाद शिंदे (वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ अजिनाथ शिंदे आणि त्याची पत्नी भाजी खरेदी करत असताना, आरोपी विकास शिंदे याने जुन्या व्यवहारावरून त्यांच्यासोबत वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री फिर्यादी अमोल शिंदे वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी आले. तेव्हा आरोपीने त्याची रिक्षा फिर्यादीच्या गाडीसमोर लावली, रिक्षातून कोयता घेऊन खाली उतरला आणि फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
मिक्सरच्या धडकेत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
हिंजवडी परिसरात जड वाहनांना मनाई असलेल्या वेळेत बेदरकारपणे मिक्सर ट्रक चालवून एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर तिची आई गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी हिंजवडी, फेज २ येथील इन्फोसिस सर्कलजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
प्रत्युषा संतोष बोराटे (११) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी सागर सुभाष आगलावे (४५, बुधवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फरहान मुन्नू शेख (२५, वाकड, पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई आहे. आरोपी फरहान शेख याने या नियमाचे उल्लंघन करून, भरधाव वेगाने मिक्सर ट्रक (एमएच १४/एचयू ७४२२) चालवली. त्याने ॲक्टिवा गाडीला (एमएच १४/एलसी ५१७४) जोरात धडक दिली. या अपघातात गाडीवरील महिला वैशाली बोराटे या गंभीर जखमी झाल्या. तर त्यांची मुलगी प्रत्युषा बोराटे हिचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
मेफेड्रोन विक्री प्रकरणी दोघांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
भोसरी येथील पुणे-नाशिक हायवे रोडवर मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा मेफेड्रोन आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (१३ ऑगस्ट) पहाटे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महेबुब चाँद शेख (२५, कोंढवा खुर्द, पुणे) आणि नासिर चाँद शेख (२७, कासारवाडी, पुणे) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ६.८४ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, १२ हजार रुपयांचा मोबाईल, ९ रिकामी प्लास्टिक पाऊच, ३ लाख ४० हजार रुपये किमतीची एक रिक्षा आणि काही रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे अंमली पदार्थांची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी हे पदार्थ बाळगत होते. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
टाटा मोटर्स कंपनीतून मटेरियलची चोरी, तिघांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी येथील एच ब्लॉक फेब्रिकेशन यार्डमधून ५ लाख ५ हजार रुपये किमतीचे मटेरियल चोरून त्याचा अपहार केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत टाटा मोटर्स कंपनीत घडली आहे.
याप्रकरणी दीपू श्रीकेशन सिंह (३५, शाहूनगर, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कमलेश त्रिभुवन निषाद (२९, शाहूनगर, चिंचवड), दीपक भाईराम लेवा (३४, संभाजीनगर, चिंचवड) आणि उमरफारुख राजुद्दीन शेख (नेहरूनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे टाटा मोटर्स कंपनीत काम करतात. त्यांनी संगनमत करून कंपनीतील ५ लाख ५ हजार रुपये किमतीचे मटेरियल ट्रकमध्ये भरले. हे मटेरियल टाटा मोटर्सच्या मावळ येथील प्लँटमध्ये घेऊन जाण्याऐवजी, आरोपींनी त्याचा परस्पर अपहार करून कंपनीचा विश्वासघात केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
गांजा विक्रीप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
दापोडी येथील रेल्वे स्टेशनमागे एका व्यक्तीला २६ हजार २०० रुपये किमतीचा ५४० ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी करण्यात आली.
सचिन यादव अडागळे (४२, दापोडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयदीप सोनवणे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन अडागळे हा ५४० ग्रॅम वजनाचा आणि २६,२०० रुपये किमतीचा गांजा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
मोशी येथे ७८ हजार रुपयांचे अफिम जप्त, एकाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 )
मोशी येथे एका व्यक्तीला अवैधरित्या अफिम विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ७८ हजार ४०० रुपये किमतीचे १०२ ग्रॅम अफिम आणि तीन लाख रुपयांची होंडा सिटी गाडी जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील देवासी किराणा दुकानासमोर पार्किंगमध्ये करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कपिलेश इगवे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओमाराम वेनाराम देवासी (२४, बोऱ्हाडेवाडी, मोशी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमाराम देवासी त्याच्या होंडा सिटी गाडीमध्ये (एमएच १२/ईजी ५३६९) १०२ ग्रॅम वजनाचा अफिम बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडून अफिम आणि गाडी असा एकूण ३ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.