Team My pune city – पिंपरी येथील आयसीआयसीआय बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर ( Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025) आली आहे. ही घटना २० मार्च रोजी आयसीआयसीआय बँक ऑटोक्लस्टर, एम्पायर स्केअर, पिंपरी येथे घडली असून याप्रकरणी १२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेतील डेप्युटी मॅनेजरने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद मेडिको दुकानातील भास्कर सखाराम खोपकर यांनी होलसेल मेडिकलचे दुकानदार आनंद सुरेश गांधी यांच्याकडून ८० हजार १०० रुपये रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी आणले होते. बँकेतील कॅशिअर प्रवीण विवेक क्षीरसागर यांनी ग्लोरीकॅश सोर्टिंग मशीनमध्ये या नोटा तपासल्या असता २०० रुपयांच्या ९ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. याबाबत आनंद गांधी यांना विचारणा केली असता, त्यांचे अंदाजे ९० ते १०० रिटेलर दुकानदार असल्याने या बनावट नोटा कोणी दिल्या याबाबत त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.
ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025)
महाळुंगे गावच्या हद्दीत एका भरधाव आयशर ट्रकने पायी चालणाऱ्या तरुणीला धडक दिली. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) स्कोडा व्होक्सवॅगन कंपनीजवळ, महाळुंगे ते निघोजे रोडवर घडली.
रिया जयप्रकाश सहाणी (१८)असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणात राहुल जयप्रकाश सहाणी (२५, निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन मारुती पानचावरे (३२, उरुळी देवाची जि. पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन पानचावरे हा आयशर ट्रक (एमएच ०९/ईएम ९०२६) भरधाव वेगात चालवत होता. वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो पायी चालत असलेल्या रिया सहाणी हिच्या अंगावर पलटी झाला. यामध्ये रिया सहाणी गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Ambedkar Bhavan : आंबेडकर भवन शेजारील जमीन खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय अखेर रद्द
जमिनीच्या वादातून एकास मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025)
चार जणांनी मिळून एका व्यक्तीला जमिनीच्या वादातून मारहाण केली. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारी साबळेवाडी खेड येथे घडली.
या प्रकरणात राजेश हनुमंत काटकर (३९, साबळेवाडी, ता. खेड जि. पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भरत सोपान काटकर, राजेद्र सोपान काटकर, राहुल एकनाथ काटकर, स्वप्नील एकनाथ काटकर (सर्व रा. साबळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश काटकर यांनी आरोपींना जमीन उकरण्याचा जाब विचारला. त्या कारणावरून आरोपींनी काटकर यांना शिवीगाळ केली. फिर्यादीचा भाऊ प्रशांत याने शिवीगाळ करू नका असे म्हटले असता आरोपी राहुल याने प्रशांतला लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या पायावर मारहाण केली. फिर्यादी त्याला अडवायला गेले असता आरोपी भरत याने त्यांच्या डोक्यात दगड मारला, ज्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. फिर्यादीच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी राजेंद याने त्यांच्या कानशिलात मारली. चाकण पोलीस तपास करत आहेत.
मित्रांनीच केली तरुणाला मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025)
वाकड येथील छत्रपती चौकात एका तरुणाला त्याच्या मित्रांनीच मारहाण केली. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री घडली.
याबाबत पवन रविंद्र पाटील (२१, छत्रपती चौक, वाकड, मुळ रा. देवपूर धुळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मनीष भाऊसाहेब पाटील (कोथरुड, पुणे) आणि देवेंद्र संजय पाटील (धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन पाटील हे जेवण करून त्यांच्या खोलीजवळ परत आले असताना दोन आरोपी मोटारसायकल घेऊन उभे होते. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावरील शर्ट पकडून कानशिलात मारले, यात त्यांच्या चष्म्याची काच फुटून डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली. आरोपी मनीष याने पवन यांच्या हातातील स्टीलच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेमध्ये उद्या पाणी नाही!
दारूविक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा ( Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025)
चाकण जवळ गोणवडी गावात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारी गोणवडी गावाच्या हद्दीत स्मशानभूमी शेजारी भाम नदीच्या कडेला करण्यात आली.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सुधिर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका २० वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बेकायदेशीरपणे १० हजार ५०० रुपये किमतीची १०५ लिटर गावठी हातभट्टी दारू विक्री करण्यासाठी जवळ बाळगली होती. पोलिसांची चाहुल लागताच ती घटनास्थळावरून पळून गेली. चाकण पोलीस तपास करत आहेत.
कंपनीच्या पैशांची अफरातफर ( Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025)
भुगाव येथील ग्रंथा एंटरप्रायझेस या कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीचा विश्वास संपादन करून पैशांची अफरातफर केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ जून ते १९ जुलै या कालावधीत भुगाव येथे घडली.
या प्रकरणात विवेक जयवंत जोरी (३३, भुगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश हनुमंत झांबरे (नऱ्हे ता. हवेली) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश झांबरे हा फिर्यादीच्या ग्रंथा एंटरप्रायझेसमध्ये काम करत होता. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून गजानन स्टील औरंगाबाद यांना ८ लाख १२ हजार ३९३ रुपयांचे एसी ब्लॉक आणि ब्लॉक जॉईंटिंग मोटर असे बांधकाम साहित्य दिले. मात्र, त्याने ती रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवून अफरातफर केली आणि कंपनीची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025)
चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन आरोपींनी एका तरुणाची ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २२ जून ते ८ जुलै या कालावधीत सुसगाव येथे घडली.
या प्रकरणात श्रीनिवास मंगन्नाकरुर (२६, सुसगाव पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साई केलुरी, पौर्णिमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला कॉग्निझंट कंपनीचे एचआर असल्याचे भासवले आणि चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून ४ लाख ६५ हजार रुपये आणि त्यांचा मित्र अभिषेक तळेकरकडून ८० हजार रुपये असे एकूण ५ लाख ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना बनावट ऑफर लेटर पाठवून नोकरी न देता फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.