Team My Pune City – वाकड परिसरात हॉटेल मध्ये घुसून ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025) सहा गुंडांनी एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून हॉटेलमध्ये तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी ताथवडे येथील बिस्मिल्ला केटरर्स अँन्ड बिर्याणी हाऊसमध्ये घडली.
या प्रकरणी शादाब सलीम अली (२५, ताथवडे, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम विजय कांबळे (१९, थेरगाव, पुणे), राजवर्धन अधिकराव भोसले (१९, चिंचवड, पुणे), करण ज्ञानेश्वर खंदारे (२०, साईनाथ नगर) आणि कृष्णराज संतोष परसे (२०, साईनाथनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मामा सिराज आणि इतर कामगार हॉटेलमध्ये काम करत होते. त्यावेळी सुरुवातीला तीन व नंतर तीन असे एकूण सहा अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मामाला धमकी देत दहशत निर्माण केली. जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी मामावर कोयत्याने वार केले. तसेच, त्यांच्याजवळील कोयता आणि बांबूने हॉटेलमधील फ्रिज व काचेचे काऊंटर तोडून दहशत पसरवली. त्यामुळे हॉटेलमधील गिऱ्हाईक व रस्त्यावरील येणारे-जाणारे लोक घाबरून पळून गेले. वाकड पोलीस तपास करत आहेत.
खंडणीसाठी रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
चिंचवड येथील गोल्डन चौक परिसरात एका गुंडाने रिक्षा पार्क करण्यासाठी चालकाकडे खंडणीची मागणी केली. खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपीने रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (९ सप्टेंबर) रात्री गोल्डन चौक, विद्यानगर येथे घडली.
या प्रकरणी आसिफ इकबाल खान (४३, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हसन सलीम शेख ऊर्फ हसन्या (चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या वडिलांच्या रिक्षात बसले होते, तेव्हा आरोपी कोयता घेऊन आला आणि म्हणाला की, “वडिलांची आणि भावाची रिक्षा गल्लीत पार्क करायची असेल तर महिन्याला १००० रुपये दे”. फिर्यादीने खंडणी देण्यास नकार दिल्यावर आरोपीने त्यांना जिवे ठार मारण्याच्या इराद्याने डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हात पुढे करून तो वार अडवला. त्यानंतर आरोपीने पुन्हा त्यांचा पाठलाग करत “तुझे आज नाही छोडता, तेरी मुंडी काटता” असे म्हणून गळ्यावर कोयता लावला. फिर्यादीने हात पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. आरोपीने फिर्यादीच्या वडिलांची व भावाची रिक्षा फोडून सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच त्याने इथे सगळ्यांनी मला हप्ता द्यायचा, असे ओरडून दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
गुंतवणूकीच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
‘ब्लॉक ट्रेडिंग’मध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदाराची २९ लाख ४१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २३ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत चिखली येथील मधुर अपार्टमेंटमध्ये घडली.
अनुपम प्रदिप गुळवेलकर (४०, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसा विविध बँक खात्यांचे धारक आणि अनोळखी व्यक्ती अशा एकूण दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला ‘ब्लॉक ट्रेडिंग’मध्ये जास्त फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांना ॲड केले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये २९ लाख ४१ हजार रुपये घेतले. आरोपींनी संगनमताने फिर्यादींना मूळ रक्कम व परतावा मिळणार असल्याचे भासवून त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
Ganesh Visarjan Mirvanuk : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत बदल करू नका;श्रीगणेश मंडळांची मागणी
विश्वासघात करून ११ लाखांची फसवणूक( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
विक्री करण्यासाठी दिलेल्या वाहनाची परस्पर विक्री करून त्याचे पैसे वाहन मालकाला न देता फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ आणि १२ मार्च या कालावधीत वाकड येथील रघुवीर कार हब येथे घडली.
या प्रकरणी अजय सिद्राम कोसके (६७, हिंजवडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर सुभाष जाधव (४२, घोटावडे, मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांची महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही ३०० (एमएच १२/टीएन ७५८५) गाडी विक्रीसाठी आरोपीकडे दिली होती. आरोपीने ती गाडी मोहम्मद गफूर शेख या व्यक्तीला परस्पर विकली आणि त्याचे पैसे घेतले. आरोपीने आरटीओ प्रक्रियेच्या नावाखाली फिर्यादीकडून ओटीपी घेऊन गाडी शेखच्या नावावर करून दिली, परंतु फिर्यादीला पैसे न देता ११ लाखांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.
कंपनीचे मटेरियल अटकवून ठेवल्याबाबत ट्रान्सपोर्टरवर गुन्हा दाखल ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
मिंडा कंपनीचे मटेरियल भारताच्या विविध शहरांमधून सावरदरी आणि महाळुंगे येथील प्लांट मध्ये पोहोचविण्यासाठी ट्रान्सपोर्टरकडे दिले. ते मटेरियल कंपनीकडे पोहोच न करता स्वतःकडे ठेऊन कंपनीचे नुकसान केले. ही घटना एप्रिल ते १८ जुलै या कालावधीत महाळुंगे व सावरदरी येथे घडली.
या प्रकरणी सचिन पांडुरंग देठे (४८, मोशी प्राधिकरण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ए-केअर ट्रान्सपोर्ट कंपनीचे सी.ई.ओ. मनोज नायर आणि इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने मिंडा कंपनीच्या सावरदरी आणि महाळुंगे येथील प्लांटसाठी ५४ लाख ६० हजार ४३० रुपयांचे सामान ए-केअर ट्रान्सपोर्ट कंपनीकडे सोपवले होते. नोएडा, दिल्ली, कोची, छत्रपती संभाजीनगर, रुद्रपूर या शहरांमधून हे सामान आणले होते. ते सामान लगेच प्लांटला पोहोचवणे आवश्यक असताना, जुन्या बिलांची थकबाकी असल्याचे कारण देऊन आरोपींनी ते सामान थांबवून ठेवले. त्यामुळे मिंडा कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Chakan Crime News : एमआयडीसी मध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद;लाखोंचा मुद्देमाल जप्त
व्यापाऱ्याची ४१ लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
लोखंडी पत्रे विकत घेण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची ४१ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १६ एप्रिल ते २३ मे या कालावधीत चिखली येथील एस. आर. स्टील ट्रेडर्स या गोदामात घडली.
या प्रकरणी अब्दुल्लाह रुबाबअली सय्यद (४६, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागजी राम (कराड, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागजी रामने फिर्यादीकडून लोखंडी पत्रे विकत घेत असल्याचे भासवून ४१ लाख ५ हजार ३९७ रुपयांचा माल घेतला. मात्र, त्याने त्या मालाचे पैसे दिले नाहीत आणि फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
भांडण पाहणाऱ्या तरुणाला मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
दोन गटांतील भांडण पाहत असताना एका तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली.
या प्रकरणी अनुज सचिन प्रधान (१९, काळेवाडी फाटा, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रणव दुर्गे (रहाटणी, पुणे), अथर्व दुर्गे (रहाटणी, पुणे), शैलेश साळवे आणि गठठया (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये आपापसांत भांडणे सुरू होती, तेव्हा फिर्यादी तेथे थांबून पाहत होते. आरोपींपैकी एकाने फिर्यादीजवळ येऊन “तू काय बघत थांबला आहेस” असे म्हणत त्यांच्या कानशिलात मारली. त्यानंतर फिर्यादीने त्यांचा भाऊ अथर्वला बोलावून आरोपीला जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना दगडाने, काठीने आणि रबरी पाईपने मारहाण केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
८० हजार रुपयांचे ‘एमडी’ ड्रग्स जप्त, दोघे अटकेत ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
हिंजवडी परिसरात ८० हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) हे अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (१० सप्टेंबर) पहाटे मारुंजी रोड येथे घडली.
जितनारायण जगतनारायण दुबे (२७, हिंजवडी, पुणे) आणि प्रदीप साहासिंग राजपूत (२७, हिंजवडी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश कर्पे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या ताब्यात ८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) हे अंमली पदार्थ, तीन मोबाईल फोन आणि एक ॲक्टिव्हा गाडी असा एकूण १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्यांनी हे अंमली पदार्थ मुंबई येथील चेतन नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
घरगुती वादातून मेहुण्यावर कोयत्याने हल्ला ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
घरगुती कारणावरून मनात राग धरून एका व्यक्तीने त्याच्या मेहुण्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना मंगळवारी (९ सप्टेंबर) तळेगाव-चाकण रोडवर, वाघजाई फाट्याजवळ घडली.
या प्रकरणी निलेश त्रिंबक तळेले (४३, चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धीरज प्रल्हाद गारसे (चिखली) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोटारसायकलवरून येऊन फिर्यादीवर कोयत्याने डाव्या हातावर वार केले, ज्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरची अवैध विक्री, एकावर गुन्हा दाखल ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
भोसरी येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध विक्री केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (१० सप्टेंबर) सायंकाळी भगत वस्ती, भोसरी येथे करण्यात आली.
महेश माधवराव मोरे (३२, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साळवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश मोरे हा बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर खरेदी करून मोठ्या टाक्यांमधून छोट्या ४ किलो वजनाच्या टाक्यांमध्ये धोकादायकरित्या गॅस रिफिल करत होता. कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गॅस साठा विकत होता. त्याच्याकडून ३३ हजार ६०० रुपयांचा अवैध गॅस साठा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
वृक्षतोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल ( Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025)
मावळ तालुक्यातील सुदवडी येथे बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्याबद्दल एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडली.
या प्रकरणी सुरेश काळू रावते (४२, आंबेगाव, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंडियन लॉजिस्टीक दिल्ली प्रा. लि. या कंपनीचे सीईओ प्रदीप कुमार नवल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप कुमार नवल याने सुदवडी येथील नमूद गट नंबरमध्ये कोणतीही परवानगी न घेता अवैध वृक्षतोड केली. याबाबत सुरेश रावते यांनी पाठपुरावा करून गुन्हा नोंदवला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.