Team MyPuneCity – समोरची गाडी बंद पडल्याने टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो थांबवला. त्यावेळी टेम्पोच्या पाठीमागून आलेल्या ट्रकने ( Pimpri Chinchwad Crime News 11 June 2025) टेम्पोला धडक दिली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने टेम्पो चालकाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (९ जून) रात्री इंडोरन्स चौक महाळुंगे येथे घडली.
रवी सुखदेव जाधव (३९, निघोजे, खेड) असे मारहाण झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच १२/एलटी ९७५३) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी जाधव टेम्पो (एमएच १४, ईएफ ९०३४) सावरदरी येथून निघोजे येथे जात होते. इंडोरन्स चौकात आल्यानंतर त्यांच्या समोरील कार अचानक बंद पडली. त्यामुळे जाधव यांनी त्यांचा टेम्पो थांबवला. दरम्यान, टेम्पोच्या पाठीमागून येणारा ट्रकने टेम्पोला धडक दिली. त्यावरून ट्रक चालकाने टेम्पो चालकाला दगडाने मारून जखमी केले. तसेच टेम्पोची तोडफोड करून नुकसान केले. या भांडणात जाधव यांचा मोबाईल फोन गहाळ झाला.
चांदखेड येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा ( Pimpri Chinchwad Crime News 11 June 2025)
मावळ तालुक्यातील चांदखेड येथे दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ३९ हजार रुपयांचे एक हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी चांदखेड येथील ३० वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रितेश कोळी यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चांदखेड येथे कंजारभाट वस्तीच्या मागील बाजूला दारूभट्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.
गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 11 June 2025)
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (१० जून) सकाळी चिखली येथे करण्यात आली.
रितेश सतीश कानवटे (१९, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्यासह अखिल पोपट मुलाणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रितेश कानवटे हा टपरी चालवतो. त्याने त्याच्याकडे १६ हजार २८० किंमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करत गुटखा जप्त केला. रितेश याने आरोपी मुलानी याच्याकडून आरोपीने गुटखा आणला होता.
ऑफिससमोर स्कॉर्पिओची तोडफोड; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ( Pimpri Chinchwad Crime News 11 June 2025)
ऑफिससमोर उभी असलेली स्कॉर्पिओ कार तोडफोड करून शिवीगाळ, धमकी आणि जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जून रोजी आणि रविवारी (८ जून) पिंपळे गुरव परिसरात घडली.
व्यंकटेश राजेंद्र भोसले, विघ्नेश गुणशिलन रंगम (दोघेही रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव), अनिकेल उरणकर उर्फ उन्या अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी रंगम याला पोलिसांनी अटक केले आहे. मनिष गोविंद राठी (४३, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंबासह नांदेड येथे गेले असताना, आरोपींनी त्यांच्या ऑफिससमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारची तोडफोड केली. कामगारांना धमकावत, ‘तुमचा मालक आमच्याकडे पाहत नाही,’ असे म्हणत शिवीगाळ केली. दोन दिवसांनी ऑफिसमध्ये घुसून जबरदस्तीने चोरीचा प्रयत्न केला. परिसरात मोठा आरडाओरडा करत दहशत निर्माण केली.
जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 11 June 2025)
जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यावर कांद्याची सुरी आणि दगडाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (१० जून) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील पवळेवाडी येथे घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
एक महिला आरोपी, शुभम बापू पवळे (पवळेवाडी, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कांताराम लक्ष्मण पवळे (६०, पवळेवाडी, खेड) असे जखमीचे नाव असून त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पायी जात असताना जमिनीच्या वादावरून महिला आरोपीने कांदा कापण्याच्या सुरीने बोटावर वार केला. दुसऱ्या आरोपीने दगड मारून पंजावर जखम केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 11 June 2025)
भरधाव वेगातील डंपरने दुचाकीस्वारास मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना भांबोली गावच्या हद्दीत मंगळवारी (१० जून) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली.
गणेश बाळू जाधव (२७, कुरकुंडी, खेड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. कानिफराय दिगंबर बांबले (३४, आंबेठाण, खेड) असे अटक करण्यात आलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. गोरक्षनाथ काळुराम घावटे (३०, भांबोली, खेड) यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डंपर भरधाव वेगात चालवत मागून दुचाकीला धडक दिली. अपघातात गणेश जाधव या युवकाचा मृत्यू झाला.