Team My pune city – पार्टीसाठी फार्महाऊसमध्ये आलेल्या एकाने पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले. यामुळे पार्टीतील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केला. ही घटना सुसगाव येथे मंगळवारी (८ जुलै) रात्री घडली.
दिनेश बाबुलाल सिंह (४०, मामुर्डी, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. देवराम दिनेश वर्मा (२४, सुसगाव) यांनी गुरुवारी (१० जुलै) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश याने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पार्टीदरम्यान स्वतःकडील पिस्तुलमधून दोन वेळा हवेत गोळीबार केला. यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली. तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दिनेश सिंह याला अटक केली आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
गृहकर्जाच्या बनावट कागदपत्रांवरून ४८ लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 11 July 2025 )
फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने बनावट डिमांड लेटर तयार केले. त्याद्वारे बँकेतून तब्बल ४८ लाखांचे कर्ज घेत फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 11 July 2025 ) केली. ही घटना पिंपरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत घडली.
प्रितम प्रफुल्ल वेलणकर (निगडी प्राधिकरण) आणि सुषमा महादेव माने (किवळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अतुलकुमार लाल विरेंद्र विक्रम सिंग (४३, औंध, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने निलेश पाटील यांच्या मालकीची श्रुती प्राईड ही इमारत आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून या इमारतीतील फ्लॅटचा खरेदी करार दाखविला. बनावट डिमांड लेटर तयार करून त्याआधारे बँक ऑफ इंडिया, पिंपरी शाखेतून ४८ लाखांचे गृहकर्ज घेतले. ही रक्कम सेवा विकास बँकेत सुषमा माने यांच्या खात्यात ट्रान्सफर करून बँकेची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
रहाटणीत तरुणावर कोयत्याने वार ( Pimpri Chinchwad Crime News 11 July 2025 )
दुचाकीवरून कामावर चाललेल्या तरुणास रस्त्यात थांबवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना रहाटणी येथे बुधवारी (९ जुलै) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास एसएनबीपी स्कूल जवळ रहाटणी येथे घडली.
निवतन मगर (१८, थेरगाव, पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार राजू पुलावळे (२१, थेरगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (१० जुलै) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार हे दुकानात कामावर जात असताना रहाटणी येथे आरोपींनी त्यांना थांबवून शिवीगाळ केली. त्यानंतर कोयत्याने डोक्यावर व कपाळावर वार करीत गंभीर जखमी केले. आरोपींच्या साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 11 July 2025 )
भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कुरुळी गावातील स्पायसर चौक ते अराई चौकदरम्यान गुरुवारी (१० जुलै) दुपारी घडली.
रचित उमेश शिंदे (२३, भांडूप, मुंबई) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. जागेश खुमान लाल (३६, चाकण, मूळ रा. ललितपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन सोनटक्के यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रचित शिंदे हे दुचाकीवरून जात होते. ते कुरुळी गावातील स्पायसर चौक ते अराई चौकदरम्यान आले असता आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने रचित यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रचित हे गंभीर जखमी होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
भोसरीत पिस्तूलासह तरुणास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 11 July 2025 )
पिस्तुल घेऊन आलेल्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१० जुलै) दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास बैलगाडा घाट, भोसरी येथे केली.
अविनाश महादेव जाधव (२८, लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास भोसरीतील बैलगाडा घाटाजवळ आरोपी अविनाश जाधव हा २१ हजार रुपये किंमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुसे बाळगत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
हिंजवडीत गॅसचा काळाबाजार उघड; पाच जणांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 11 July 2025 )
घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करून काळ्या बाजारात त्यांची विक्री केली जात होती. पोलिसांनी छापा मारून कारवाई करीत अवैध साठ्यासह पाच जणांना अटक केली. ही कारवाई हिंजवडी येथील स्पिनी शोरूमजवळ बुधवारी (९ जुलै) करण्यात आली.
धर्मपाल जगदीश बिश्नोई (२३, हिंजवडी), अशोक बाबुराव सूर्यवंशी (३२, पिंपळे सौदागर), अशोक ओमप्रकाश खिलारी (२४, हिंजवडी), बाळु बापू हजारे (२५, मारुंजी), ओमप्रकाश सोहनलाल बिल्लेरी (४५, हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील विजय नलगे यांनी गुरुवारी (१० जुलै) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे घरगुती गॅस सिलेंडरमधून धोकादायक पद्धतीने व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस ट्रान्सफर करीत असताना मिळून आले. घरगुती वापराच्या सिलेंडर पेक्षा व्यावसायिक सिलेंडर महाग असल्याने ते सिलेंडर चढ्या दराने आरोपी विकत होते. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी आरोपींकडून २० लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.