Team My pune city – मित्रासोबत किरकोळ वाद ( Pimpri Chinchwad Crime News 11 August 2025)झाल्यावर एका नेपाळी तरुणाने त्याच्या डोक्यात बिअरची रिकामी बाटली मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पांडवनगर, हिंजवडी येथील होम स्टे हॉस्पिटॅलिटी पी.जी. मध्ये घडली.
याप्रकरणी अभिनव मनोजकुमार पाठक (२७, पांडवनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलन साहु (३०, साखरे वस्ती, हिंजवडी, पुणे. मूळ नेपाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिनव आणि आरोपी मिलन यांच्यामध्ये शनिवारी दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे रात्री अभिनव आणि इतर मित्र गप्पा मारत असताना मिलन त्यांच्यासोबत बोलत नव्हता. अभिनव यांचा मित्र लक्ष्मण साही यांनी मिलन याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मिलन याने बिअरची रिकामी बाटली अभिनव यांचा डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
शेजाऱ्यांकडून एकास लोखंडी रॉडने मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 11 August 2025)
शेजाऱ्यांनी ‘तुम्ही आमच्याबद्दल बोलत होता का’ असे विचारून शिवीगाळ करत एकास लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री १०.४५ वाजता निगडी येथील अजिंठानगरमधील रमाबाई शाळेच्या मागे घडली.
याप्रकरणी अमोल उर्फ अमर उत्तम ढोबळे (३३, अजिंठानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दयानंद घाडगे (अजिंठानगर, निगडी) आणि मनोज घाडगे (अजिंठानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या आई आणि वडिलांसोबत घरात बोलत असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीने त्यांचा दरवाजा वाजवला. आरोपी दयानंद याने फिर्यादीला घराबाहेर बोलावून ‘तुम्ही आमच्याबद्दल बोलत होता का?’ असे विचारले. यावरून राग आल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारले. आरोपी मनोज याने फिर्यादी, त्यांची आई आणि वडिलांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 11 August 2025)
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (१० ऑगस्ट) दुपारी शंकरनगर, विद्यानगर येथील खदानीजवळ करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र तळपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सूरज शहाजी शेवाळे (२५, अष्टविनायक चाळ, पावनेगाव, तुर्भे, नवी मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे खदानीजवळ एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुरज शेवाळे याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून 40 रुपये किमतीची पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
Nana Kate : विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त माउलीच्या मंदिराला देणगी
अवैधरित्या गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 11 August 2025)
घरगुती सिलेंडरमधून गॅसची अवैधरित्या चोरी करताना एका तरुणाला पकडण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (९ ऑगस्ट) संध्याकाळी भोसरी येथील चक्रपाणी वसाहतमधील लक्ष्मी गॅस इंटरप्रायझेस दुकानात करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रकाश भोजणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी परमेश्वर दयानंद माने (२६, धावडे वस्ती, भोसरी, पुणे मूळ आंबेगाव, लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरलेल्या घरगुती गॅस सिलिंडरमधून मोकळ्या सिलिंडरमध्ये गॅस भरत होता. मानवी जीवनाला धोका निर्माण होईल हे माहित असूनही त्याने ज्वालाग्राही पदार्थाबाबत कोणतीही खबरदारी घेतली नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.