Team MyPuneCity – सून आणि नातीने मिळून सासूच्या घरातून सहा लाख ८५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना २ एप्रिल रोजी आकुर्डी ( Pimpri Chinchwad Crime News 10 June 2025) येथे घडली.
याप्रकरणी ६२ वर्षीय सासूने ९ जून रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सून अंजु शैलेश चव्हाण (३२) आणि तिच्या मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यांच्या मुलाची पत्नी अंजु चव्हाण आणि तिची मुलगी यांनी बनावट चवीच्या साहाय्याने कुलूप उघडले. कपाटात ठेवलेल्या सुटकेस मधून सहा लाख ८५ हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
कंपनीत चोरी करण्याचा प्रयत्न, एकास अटक
कंपनीच्या पाठीमागील बाजूने प्रवेश करत साहित्य चोरून नेत असताना कंपनीतील कामगारांनी एका चोरट्याला पकडले. दरम्यान त्याचे तीन साथीदार पळून गेले. ही घटना रविवारी (८ जून) रात्री खराबवाडी येथील स्पाल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी इंडिया प्रा ली या कंपनीत घडली.
गणेश बहादूर कोळी (२६, आंबेठाण, खेड) असे पकडलेल्या चोराचे नाव आहे. त्याच्यासह अभय पटीकर, मोन्या डोलेकर, सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुधीर विनायकराव पाटील (४९, पिंपरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या पाठीमागील बाजूने भिंतीवरून आरोपींनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख २८ हजारांचे साहित्य चोरी करताना कंपनीमधील कामगारांनी आरोपींना पाहिले. कामगारांनी गणेश कोळी याला पकडले. दरम्यान त्याचे तीन साथीदार पळून गेले.
जमिनीच्या व्यवहारात फसवणूक, १२ जणांवर गुन्हा दाखल ( Pimpri Chinchwad Crime News 10 June 2025)
मागासवर्गीय महिलेच्या आजीची जमीन साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र करून स्वतःच्या नावावर केल्या प्रकरणी १२ जणांच्या विरोधात फसवणूक आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ डिसेंबर २००३ ते २ मार्च २०१० या कालावधीत पाईट खेड येथे घडली.
याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोपट मारुती घनवट (७४), शंकर मारुती रौंधळ (मयत), काळुराम महादू जाधव (७५), विजय सुदाम घनवट (४४), संतोष शंकर रौंधळ (मयत), भगवान शंकर गायकवाड, चिंतामण कृष्णा रौंधळ, अरुण गुंडाळ आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या आजीची खेड तालुक्यातील पाईट येथे ८६ गुंठे जमीन होती. आजीने ही जमीन शंकर रौंधळ यांना परत देण्याच्या बोलीवर १९६७ साली विक्री केली होती. त्या व्यवहारानुसार १९८९ साली शंकर रौंधळ यांनी ती जमीन फिर्यादी यांच्या वडिलांना परत दिली होती. त्याचा लेखी करार आणि मोबदला शंकर रौंधळ यांनी घेतला होता. दरम्यान शंकर रौंधळ यांचा ११ सप्टेंबर १९९७ रोजी मृत्यू झाला. या व्यवहाराची माहिती असताना आरोपी पोपट घनवट याने शंकर रौंधळ यांच्या नावाचा तोतया व्यक्ती उभा करून त्याच्याकडून स्वतःच्या नावावर साठेखत आणि काळुराम जाधव याच्या नावावर कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर तपास करीत आहेत.
PCMC: देशात प्रथमच! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग्रीन बाँड’चे शेअर बाजारात लिस्टिंग!
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीची एक पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. वाकड पोलिसांना माहिती मिळाली कि, कस्पटे चौकाजवळ वाकड येथे दोघेजण पिस्तूल घेऊन आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. प्रणव प्रकाश शेवाळे (२०, थेरगाव), औदुंबर उर्फ मोन्या नखाते (२९, गोखले नगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वंदू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी दोघांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 10 June 2025)
अवैधरित्या मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस रिफील करणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (९ जून) चिंतामणीनगर, चिखली येथे करण्यात आली.
अभिषेक वीरभद्र स्वामी (२४), प्रदीप दिगंबर उपासे (२२, चिखली. मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन सावंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक याने प्रदीप याच्या सांगण्यावरून कोणतीही खबरदारी न घेता अवैधरित्या घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस रिफील केला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत ३४ हजार ७० रुपये किमतीचे पाच घरगुती वापराचे सिलेंडर, १० सिलेंडरच्या लहान टाक्या, गॅस रिफील करण्याचे साहित्य, इलेक्ट्रिक वजनकाटा असे साहित्य जप्त केले आहे.
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ( Pimpri Chinchwad Crime News 10 June 2025)
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ जून रोजी दुपारी चऱ्होली येथे घडली.
सुजाता नरसिंग माने (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुजाता यांचे वडील शिवाजी संपतराव सूर्यवंशी (५६, थेरगाव) यांनी सोमवारी (९ जून) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरसिंग वामनराव माने (३३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता आणि आरोपी नरसिंग यांचा २५ जून २०१९ रोजी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर नरसिंग याने सुजाता दिसायला चांगल्या नाहीत, असे म्हणून त्यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी भांडण करून माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. फ्लॅटसाठी तसेच आर्थिक अडचणी असल्याचे सांगून सुजाता यांचे दागिने नरसिंग याने गहाण ठेवले. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून सुजाता यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
खोली खाली करण्याची धमकी देत तरुणाला मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 10 June 2025)
खोली खाली करण्याची धमकी देत चौघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना रविवारी (८ जून) रात्री सुसगाव येथे घडली.
निखिल दिलीप धावडे (२०, सुसगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता चंदन आणि आणि इतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने निखिल याला फोनवर खोली खाली करण्याची धमकी दिली. त्यानंतर निखिल यांच्या खोलीत येऊन आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले.
सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक
चारचाकी वाहनांचे सर्व्हिस सेंटर सुरु करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगून ४० लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २ जानेवारी २०२२ ते ९ जून २०२५ या कालावधीत पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी पिंपरी येथील ४० वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत नागेश दीक्षित (४०), संतोष नागेश दीक्षित (३५, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्युंदाई कंपनीच्या चारचाकी वाहनांचे सर्व्हिस सेंटर सुरु करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगत महिलेकडून ४० लाख रुपये घेतले. या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. मात्र कोणताही परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न करता आरोपींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
ट्रेडिंग ऍपद्वारे ३२ लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 10 June 2025)
ट्रेडिंग मध्ये चांगला नफा मिळेल असे सांगून एचएनडब्ल्यूएसीसी या ट्रेडिंग ऍपद्वारे पैसे घेऊन पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १८ मे ते ४ जून या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.
समीर श्रीपाद आपटे (५५) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी आपटे यांच्याशी फोनवरून संपर्क केला. त्यांना एका व्हाट्स अप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. तिथे त्यांना एचएनडब्ल्यूएसीसी या ट्रेडिंग ऍपद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगण्यात आले. त्यानुसार आपटे यांनी ३२ लाखांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.