Team MyPuneCity –पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री आठ वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माणगाव येथे घडली.
सोहन अशोक बडवणे आणि अनिकेत राजू लामतुरे (दोघेही रा. मोहिते वस्ती, माण गाव, ता. मुळशी, जि. पुणे, मुळ रा. नवीन पुसद, जि. यवतमाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तेजस सुनील मोहिते (वय 22, रा. मोहिते वस्ती, माणगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शनिवारी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 वाजता फिर्यादी हे घराकडे पायी जात असताना वरील आरोपींनी सोहम पवार यांच्याशी भांडण आहे आणि तू त्याचा मित्र आहेस या कारणावरून संगनमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्यांच्या पोटात आणि खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 200 टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची 27 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना कुंजीर चौक, पिंपळे सौदागर येथे घडली.
याप्रकरणी अज्ञात मोबाइल धारक, एफवायइआरएस इन्व्हेस्टमेंट ग्रुप आणि एचएनडब्ल्यूएसीसी या अॅप्लीकेशनचे पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतअल्कोव सोसायटी, कुंजीर चौक, पिंपळे सौदागर येथे राहणा-या 47 वर्षीय नागरिकाने शनिवारी (दि. 31) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल 2025 ते 28 मे 2025 या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क करून 200 टक्के परतावा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर फिर्यादी यांना अॅप डाउनलोड करायला सांगून वेगवेगळ्या खात्यांवर एकूण 27 लाख 50 हजार रुपये जमा करवून घेत फसवणूक केली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
इन्व्हेस्टमेंट लिंकद्वारे 47 लाखांची ऑनलाइन फसवणूक
शेअर मार्केटच्या नावाखाली एका तरुणाची 47 लाख 44 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रावेत येथे घडली.
मोबाईल नंबर – 91733801991, 8790942440, 7418483696, बँक अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रावेत येथील रंजन हाइटस्, एस. बी. पाटील रोड येथे राहणा-या 37 वर्षीय नागरिकाने शनिवारी (दि. 31) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस इन्व्हेस्टमेंट लिंक पाठवून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील केले. त्यांना अधिक पैसे मिळतील असे सांगून विविध खात्यांवर वेळोवेळी 47 लाख 44 हजार 500 रुपये जमा करवून घेतले. पैसे परत मागितल्यावर 20% कमिशन व टॅक्स भरावा लागेल असे सांगून पुन्हा रक्कम घेतली, मात्र पैसे परत न देता फसवणूक केली. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
नवीन चप्पल तुटल्याने दुकानदारास मारहाण
नवीन खरेदी केलेली चप्पल लगेच तुटल्याच्या कारणावरून दुकानदारास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना 21 मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे घडली.
विजय रामा बाभळे (वय 35), राहुल नारायण कांबळे (वय 22), रवी नारायण कोचले (वय 27) आणि सिद्धार्थ राजेश वाघुळे (वय 21, सर्व रा. पवारनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तुषार अशोक तरटे (वय 32, रा. सोलाना सोसायटी, थेरगाव) असे जखमी दुकानदाराचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. 31) याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन चप्पल तुटल्याचा राग व्यक्त करून वाद घातला. त्यानंतर हाताने, पायाने मारहाण केली. आरोपी राहूल कांबळे याने लाकडी काठीने डोक्यात मारून जखमी केले. सर्व आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत धमकी दिली. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
पाणी न दिल्याने तरुणावर ब्लेडने वार
पिण्यासाठी पाणी देण्यास नकार दिल्याने एकाने तरुणावर ब्लेडने वार करीत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 31) दुपारी दीड वाजताच्या सुमारास पडवळनगर, थेरगाव येथे घडली.
साहिल पठाण (रा. संभाजी बारणे झोपडपट्टी, पडवळनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. समद सादिक शेख (वय 21, रा. शेख निवास, रेहमानिया मस्जिद समोर, पडवळनगर, थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी दुपारी 1.30 वाजतर आरोपीने फिर्यादी यांना पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र फिर्यादी यांनी त्यास हाताने पाणी घेण्यास सांगितले. याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीवर ब्लेडने वार करीत जखमी केले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.