Team My pune city – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ( Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025)आहे. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) रात्री खराबवाडी, ता. खेड येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन रामआसरे यादव (२३, अलाहाबाद, उत्तरप्रदेश, सध्या चाकण, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन हा त्याची पत्नी गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहत असल्याचा संशय घेत होता. यावरून तो पत्नीला सतत भांडण करून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी त्याने दिवसभर भांडण केले आणि सायंकाळी पत्नीला प्लास्टिकचे स्टूल, लाकडी बेलणे, पीव्हीसी पाईप आणि काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात आणि डोक्यावर मारहाण केली. तसेच पत्नीच्या पोटात चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला मारून टाकले. जेव्हा मयताचा मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाला पाठीत लाकडी बेलण्याने मारले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
उधारी मागितल्याने हॉटेल मालकाला पिस्तुलाचा धाक ( Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025)
हॉटेलमध्ये जेवण केलेल्या जेवणाचे आणि दारूचे बिल मागितल्याने दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली आणि पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) रात्री उडपी बार आणि रेस्टॉरंट, जुना मुंबई पुणे हायवे पिंपरी येथे घडली.
या प्रकरणात निवृत्ती एकनाथ वाघ (४०, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सनी अशोक परदेशी (३२, पिंपरी) आणि रोहित बोथ (२५, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी उडपी बार आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण आणि दारू प्यायल्यानंतर १९४३ रुपयांचे बिल देण्यास नकार दिला. जेव्हा फिर्यादीने बिल मागितले, तेव्हा त्यांनी त्यांना शिवीगाळ करून, ‘तुला गोळ्या घालतो, तू मला ओळखत नाहीस काय’ असे म्हणून धमकावले. आरोपी सनीने कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीला जिवे मारण्याची भीती दाखवली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
Ganja smuggling : कारागृहातून सुटताच करत होता गांजाची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चाकू दाखवून खंडणी आणि दारूची मागणी ( Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025)
चाकूचा धाक दाखवून दोन व्यक्तींनी एका तरुणाकडून रोख रक्कम, ऑनलाइन पैसे आणि दारूची मागणी करून खंडणी उकळली. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) दुपारी मोरवाडी चौक ते काळभोरनगर, चिंचवड, पुणे येथे घडली.
या प्रकरणात गुलशनकुमार योगेंद्र राय (२५, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज आनंद शिंदे (२९, चिंचवड) आणि आकाश अर्जुन खोडके (२७, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राय हे पायी चालत जात असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकू दाखवून ‘ठार मारण्याची’ धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीला त्यांच्या बँक खात्यातील सर्व पैसे आणि दारू देण्याची मागणी केली. या धमक्यांमुळे घाबरून फिर्यादीने त्यांना १० हजार रुपये रोख, १० हजार रुपये ऑनलाइन आणि ५२५ रुपयांची दारू घेतली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
जमिनीच्या वादातून भावांमध्ये मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025)
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका भावाने आपल्या मोठ्या भावाला मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी आल्हाटवस्ती, लवळे येथे घडली.
याबाबत रमेश तुकाराम सातव (५९, लवळे, ता. मूळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय तुकाराम सातव (५५, माळवाडी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी मोजणी झाल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या लहान भाऊ संजय याला, ‘आता माझी जमीन मला दे’ असे म्हटले. यावर आरोपीने फिर्यादीला ‘तुला जमीन देत नाही, काय करायचे ते कर’ अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने हाताने मानेवर चापट मारली आणि गजाने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर मारून त्यांना जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.
मॅफेड्रॉन विक्री प्रकरणी दोघांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025)
अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांकडून लाखो रुपयांचे ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (५ ऑगस्ट) कावेरीनगर भाजी मंडईजवळ, वाकड येथे करण्यात आली.
बालाजी भारत चकृपे (३७, दिघी) आणि समाधान गणेश गंगणे (१९, दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर भाजी मंडईजवळ मॅफेड्रॉन विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बालाजीकडून २ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ५६.८० ग्रॅम एमडी पावडर आणि आरोपी समाधानकडून ५९ हजार २०० रुपये किमतीचे ११.८४ ग्रॅम एमडी पावडर जप्त केले. दोघांकडून एकूण ३ लाख ४३ हजार २०० रुपये किमतीचे ६८.६४ ग्रॅम एमडी पावडर, हा अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ताब्यात ठेवलेला आढळला. वाकड पोलीस तपास करत आहेत.
TP Scheme in Darumbre : दारुंब्रे गावातील टी.पी. योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
महाळुंगे येथे बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश, ८८ सिलेंडर जप्त ( Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025)
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (६ ऑगस्ट) निघोजे गावातील संस्कार गॅस एजन्सी अँड रिपेअरिंग सेंटर येथे करण्यात आली.
आकाश विजय गोसावी (२०, चाकण) आणि तीर्थराज विठ्ठल गिरी (३४, अंबी जळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे गॅस रिफिलिंगसाठी कोणताही परवाना नव्हता. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असतानाही, ते ज्वालाग्राही पदार्थांबाबत पुरेशी खबरदारी न घेता घरगुती सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ११ लाख ६ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ८७ घरगुती आणि एक लहान असे एकूण ८८ गॅस सिलिंडर, एक वजन काटा, गॅस रिफिल करण्याचे साहित्य आणि एक चारचाकी वाहन यांचा समावेश आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.